थाळी, टाळ, पिपाण्या अन्‌ निषेध

लक्ष्मी रस्ता - डीजे बंदीचा निषेध करणारा कार्यकर्ता.
लक्ष्मी रस्ता - डीजे बंदीचा निषेध करणारा कार्यकर्ता.

पुणे - ‘एक ही भूल, कमल का फूल’, ‘तुमचे नारळ तुमच्याकडेच ठेवा’, ‘नो डॉल्बी, नो बीजेपी...’ अशा निषेधाच्या घोषणा अन थाळी, टाळ, पिपाण्या आणि आसुडाचा आवाज... सोमवार सकाळनंतर डीजे बंद ठेवण्यास भाग पाडल्यात आल्याने गणेश मंडळांनी निषेध नोंदविला. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी संयम पाळत शांततेत मिरवणूक पार पाडण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी डीजेबाबत केलेले विधान, त्यानंतर पोलिसांनी डीजेवर कारवाई करण्याचा दिलेला इशारा, या सगळ्या पार्श्‍वभूमीवर विसर्जन मिरवणूक पार पडली. रविवारी रात्री बारापर्यंत बहुतेक मंडळांचे डीजे चालू होते; परंतु दुसऱ्या दिवशी (सोमवार) पोलिसांनी डीजे सुरूच करू दिले नाहीत. यामुळे पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात वादाचे प्रसंगही झाले. काही मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसादही दिला. पावणेअकराच्या सुमारास केळकर रस्त्यावरून रास्ता पेठेतील सम्राट मंडळ ट्रस्ट, टिळक रस्त्यावरून शेवटचे गोकूळ वस्ताद तालीम मंडळ हे पुढे रवाना झाले आणि या मार्गावरील मिरवणुकीची सांगता झाली, तर लक्ष्मी रस्त्यावरून भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळ साडेबाराच्या सुमारास टिळक चौकात दाखल झाले. 

विसर्जन मिरवणुकीत टिळक चौकातून २०५ गणेश मंडळे पुढे रवाना झाली होती. दुसऱ्या दिवशी बहुतेक मंडळांचे डीजे बंद ठेवण्यात आल्याने, कार्यकर्त्यांनी थाळी, टाळ, टाळ्या आणि पिपाण्या वाजवल्या. पालकमंत्री बापट यांचा निषेध अनेक मंडळांनी केला, ‘नो डॉल्बी, नो बीजेपी’, ‘स्पीकर बंद ठेवल्याचा निषेध’, असा मजकूर हातात घेऊन काही कार्यकर्ते सहभागी झाले होते. टिळक चौकात महापालिकेतर्फे गणेश मंडळांचे श्रीफळ देऊन स्वागत केले जाते. सोमवारी एकाही मंडळाने पालिकेकडून होणारे स्वागत स्वीकारलेच नाही. स्वागत कक्षाकडे लांबूनच हात जोडून कार्यकर्ते निषेध नोंदवीत होते.

‘एक ही भूल, कमल का फूल’ 
काही मंडळांनी थेट ‘डीजे’वरच निषेधाच्या घोषणा देत, ‘महापौर तुमचे नारळ तुमच्याच लोकप्रतिनिधींना द्या’, ‘आम्ही त्यांचे विसर्जन करणार आहोत’, ‘एक ही भूल, कमल का फूल’, अशा घोषणांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com