मानाच्या बाप्पांचे हौदात विसर्जन

Kasba-Ganpati
Kasba-Ganpati

पुणे - वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरवात रविवारी महात्मा फुले मंडई येथून सकाळी साडेदहा वाजता झाली. तत्पूर्वी चौकातील लोकमान्य टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत आरती झाल्यावर मिरवणूक मार्गस्थ झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषात गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पाचही मंडळांनी हौदातील पाण्यात मूर्तीचे विसर्जन केले.

मानाचा पहिला - कसबा मंडळाची चांदीची पालखी 
‘मोरया’, ‘मोरया’चा जयघोष करीत चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. देवळणकर बंधूंचे नगारावादन, रोटरी क्‍लब ऑफ पुणे, बॅंक ऑफ इंडिया, आर्ट ऑफ लिव्हिंग, कामायनी विद्यार्थ्यांचे पथक, आदिवासी मुलांचा सहभाग आणि रमणबाग, शिवगर्जना, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथकांनी केलेले जल्लोषी वादन आणि प्रभात बॅंडने देशभक्तीपर आणि बाप्पांच्या गाण्यांच्या सूमधुर सुरावटीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 
मिरवणुकीस सुरवात - सकाळी १०.३० वाजता.
विसर्जन - चार वाजून आठ मिनिटांनी 

मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्‍वरी मंडळात शंखनाद
श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. सतीश आढाव यांचे नगारावादन होते. छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत बच्चेकंपनी आणि तरुणी घोड्यावर स्वार झाल्या होत्या. चौका-चौकांत शंख निनाद करण्यात येत होता. उडत्या चालीची गाणी लावू नका, प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून दूर राहा आणि जात, धर्म, पंथ यांपेक्षाही आम्ही आहोत ‘भारतीय’ असे समाजप्रबोधनपर संदेशही फलकांच्या माध्यमातून देण्यात आले. रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेज, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, युवा, शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथकांचे वादन जोशपूर्णहोते. 
मिरवणुकीस सुरवात - सकाळी १०.३५ वाजता 
विसर्जन - सायंकाळी ५.१७ वाजता 

मानाचा तिसरा - गुरुजी तालीम मंडळात बाउंसर
फुलांच्या रथात श्रींची मिरवणूक काढण्यात आली. मंडळाने यंदा गुलालाची उधळण करणे टाळले. मिरवणुकीत अग्रभागी नगरकर बंधूंचे नगारावादन, नादब्रह्म, गर्जन पथकातील वादकांनी वेगवेगळ्या तालावर ठेका करीत वादनात रंगत आणली. पंचधातूंची श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीरथावर होती. श्रींच्या रथाच्या बाजूने बाउंसरनी कडे केले होते. मोरयाच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली.    
मिरवणुकीस सुरवात - सकाळी १०.४३ वाजता 
विसर्जन - सायं ५.३३ वाजता   

मानाचा चौथा - तुळशीबाग मंडळात मल्लखांब प्रात्यक्षिके
मंडळाच्या महागणपतीची मूर्ती शेषात्मक गणेशरथावर विराजमान झाली होती. मूर्तीची भव्यता टिपण्यासाठी मोबाईलचे कॅमेरे आणि व्हिडिओवरून होणारे चित्रीकरण लक्षवेधी ठरले. फायबर ग्लास आणि आकर्षक फुलांची सजावट रथावर करण्यात आली होती. लोणकर बंधूंचे नगारावादन, डॉक्‍टर पथक, गजलक्ष्मी हिंद तरुण मंडळ, स्व-रूपवर्धिनी या ढोल-ताशा पथकांतील वादकांच्या उत्साहपूर्ण वादनाने रंगत आणली. मल्लखांबांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले.  
मिरवणुकीस सुरवात - १२.२५ वा. 
विसर्जन - ६.२५ वा. 

मानाचा पाचवा - केसरीवाड्यातर्फे लोकमान्यांचा लक्षवेधी पुतळा
शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त केसरीवाड्याच्या गणपतीच्या मिरवणुकीत इतिहासप्रेमी मंडळाचा रथ होता. त्यावर लोकमान्य टिळकांच्या भूमिकेतील कलाकार नागरिकांना अभिवादन करीत होते. लोकमान्यांचा साडेनऊ फूट उंचीचा पुतळा असलेला रथही लक्षवेधी ठरला. श्रीराम आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांनी नवनवे ताल व ठेका धरत मिरवणुकीत जल्लोष भरला. पारंपरिक पालखी रथात श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. 
मिरवणुकीस सुरवात - १.४० वाजता 
विसर्जन - सायंकाळी ७.०५ वाजता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com