गणेशभक्तांच्या उत्साहावर ‘पाणी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मोठ्या प्रमाणात देणगी जमा केल्या. मात्र, पावसाचा त्यावर परिणाम झाला. मोठ्या भावनेने काम केल्यानंतर भाविकांची गर्दी अपेक्षित असते. त्यामुळे हवी तशी गर्दी होत नाही.     
- नीलेश पिंगळे, कार्यकर्ता

पिंपरी - पावसामुळे गणेशोत्सवात भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरले. दरवर्षी गणेशोत्सवाची आरास, जिवंत, हलते देखावे पाहण्यासाठी दरवर्षी होणारी भाविकांची तुडुंब गर्दी होते. यंदा मात्र सततच्या पावसामुळे देखावे पाहण्यासाठी भाविकांना फारसे बाहेर पडता आले नाही.

चिंचवड, आकुर्डी, भोसरी, सांगवी, पिंपरी परिसरात रात्री बारा वाजेपर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी असते. शनिवार व रविवार जोडून सुटी आल्याने; तसेच सरकारी कार्यालयांनाही या आठवड्यात दिवसाआड सुट्या मिळाल्या. मात्र, देखावे पाहण्याच्या वेळेतच पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे नागरिक देखावे पाहण्यास कुटुंबासह बाहेर पडणे टाळत आहेत. पावसामुळे गर्दीत वाढ होऊन कोंडीही होत आहे. पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. 

भरमसाट खर्च पाण्यात 
मंडळांनी महिनाभर आधी देणग्या जमा केल्या. त्यांनी हलते, जिवंत, समाजप्रबोधनपर देखावे सादर केले आहेत. मात्र, गर्दी नसल्याने मंडळांचाही उत्साह मावळला आहे. विविध खेळांचे केलेले नियोजन ही बदलावे लागले. काही ठिकाणी कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यामुळे जमा झालेली रक्कम मंडळाच्या तिजोरीत पडून राहणार आहे. काही मंडळे पूरग्रस्तांना आर्थिक मदत देणार आहेत.  

‘‘पाण्यात ढोल भिजल्याने ढोलांची पाने नरम पडतात. त्यामुळे पावसात वादन करता येत नाही. प्लॅस्टिक आवरण लावून ढोल वाजवावा लागतो. त्याचा हवा तसा आवाज येत नसल्याने पथकांची नाराजी होते. लांबचे बुकिंगही घेता येत नाही. सराव महत्त्वाचा असतो,’’ असे कासारवाडी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल दौंडकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Rain Water