गणेशोत्सव2019 : गुलालाला मंडळांचा फाटा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्यादिवशी दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळी साडेपाचनंतर अधून-मधून सुरू झालेल्या पावसातही पुण्यातील अलका टॉकीज चौकात गणेशभक्तांच्या गर्दीचा महापूर आला होता. मात्र, पावसाच्या हलक्‍या सरींनंतर काहीशी कमी झालेली गर्दी रात्री साडेदहानंतर पुन्हा वाढली.

गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्यादिवशी दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळी साडेपाचनंतर अधून-मधून सुरू झालेल्या पावसातही पुण्यातील अलका टॉकीज चौकात गणेशभक्तांच्या गर्दीचा महापूर आला होता. मात्र, पावसाच्या हलक्‍या सरींनंतर काहीशी कमी झालेली गर्दी रात्री साडेदहानंतर पुन्हा वाढली. 

दरम्यान, अलका चौकातून पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होणाऱ्या अनेक मंडळांनी यंदा गुलाल आणि आकर्षक व महागड्या देखाव्यांना फाटा दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यातून यंदा स्वच्छ मिरवणुकीचा संदेश देण्यात येत असल्याचे पालिका स्वागत कक्षाकडून वारंवार सांगण्यात येत होते. 

महापालिकेच्या वतीने अलका टॉकीज चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यांवरून चौकात येणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते. या कक्षातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजपच्या शहराध्यक्ष, आमदार माधुरी मिसाळ आणि नगरसेवकांकडून प्रत्येक गणेश मंडळाचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते.

मानाचा तिसऱ्या तुळशीबाग गणपतीचे सायंकाळी सव्वापाच वाजता, चौथा गणपती तुळशीबाग पावणेसहा; तर पाचवा केसरीवाडा गणपती सहा वाजून पाच मिनिटांनी अलका चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. केसरीवाडा मार्गस्थ झाल्यानंतर सुवर्णमहोत्सवी आणि हीरकमहोत्सवी साजरे करणाऱ्या गणेश मंडळांचे गणपती क्रमाक्रमाने लक्ष्मी रस्त्यावरून अलका चौकात आगमन होण्यास सुरवात झाली.

जर्मन, इंग्लंड आणि अमेरिका येथील पर्यटकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि डॉल्बीचा वापर करणाऱ्या पहिल्या गणपतीचे रात्री नऊला अलका चौकात आगमन झाले. हा नवनाथ (अचानक) तरुण मंडळाचा गणपती कुमठेकर रस्त्यावरून आला होता. दरम्यान, रात्री साडेआठला लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या दोन गणेश मंडळांतील अंतर वाढल्याने काही काळ मिरवणूक रेंगाळली. माधुरी मिसाळ यांनी गुरुवार पेठेतील शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असलेल्या सराफ सुवर्णकार गणपतीची आरती केली. महापौर मुक्ता टिळक यांनी नातूबाग आणि मुठेश्‍वर गणपतीची अलका चौकात आरती केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan Gulal