गणेशोत्सव2019 : नदीप्रदूषण रोखण्यात संस्था, संघटनांना यश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

सोडियम बायकार्बोनेटचे वाटप
नदीप्रदूषण टाळण्यासाठी लायन्स क्‍लब ऑफ पुणे इंटरनॅशनलच्या सभासदांनी पीओपीच्या मूर्तींचे घरच्या घरी बादलीत विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्यासाठी साडेतीन हजार किलो सोडियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप केले.

गणेशोत्सव2019 : पिंपरी - गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी शहरातील अनेक संस्था, संघटनांचा गणेशोत्सवातील सक्रिय सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे यंदा विशेषत्वाने पाहायला मिळाले.

अनेकदा वाहून न गेल्यामुळे विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नदीपात्रात पडून असल्याचे दृश्‍य गणेशोत्सवानंतर पाहायला मिळते. त्यातून नदीप्रदूषण होते ते वेगळेच. मात्र, अलीकडच्या काळात विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेतल्याने चित्र पालटू लागले आहे. यंदाही त्याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला.

चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठान, डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय, महिला बचत गट, मोरया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस, लायन्स क्‍लब ऑफ पुणे फिनिक्‍स, लायन्स क्‍लब ऑफ पुणे इंटरनॅशनल आदी संस्थांनी मूर्तिदान आणि निर्माल्यदान उपक्रम राबविले. अनिरुद्ध ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे शंभर, तर पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर असोसिएशनचे ५० स्वयंसेवक मिरवणुकीच्या बंदोबस्तात होते. चापेकर चौक ते थेरगाव घाट, मोरया गोसावी मंदिर घाट, चिंचवड स्टेशन ते चापेकर चौक असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शुभम खरपुडे, जसमितसिंग वालिया यांनी निर्माल्यदानासाठी मदत केली. 

पोलिसांच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चापेकर चौकात विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, महापालिकेच्या वतीने अग्निशमन दलाचा एक बंब तैनात करण्यात आला होता. थेरगाव येथील घाटावर दोन रुग्णवाहिकांचीही व्यवस्था होती.

चहावाटप, जेवणाची व्यवस्था
नगरसेवक शीतल शिंदे यांच्या वतीने मिरवणुकीदरम्यान चहावाटप करण्यात आले. पेरकर केटरर्स व जोशी केटरर्स यांनी संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. थेरगाव येथील घाटावर नॅशनल क्राइम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे पाच, सिटिझन राइट्‌स प्रोटेक्‍शन कौन्सिल व राष्ट्रीय रक्षा सेनेचे प्रत्येकी दोन, असे नऊ जण कार्यरत होते.

पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, स्मिता पाटील, राम जाधव, भीमराव शिंगाडे यांंच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

गणेशोत्सवातील मूर्ती व निर्माल्यदान
५२६७७ - एकूण मूर्तिदान
३३ टन - एकूण निर्माल्यदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Visarjan River Pollution Organisation