मंडळांनी कायद्याची चौकट मोडू नये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

बैठकीस विविध विभागांची दांडी
यंदा बैठकीस मंडळांची उपस्थिती आश्‍वासक नसल्याने पुन्हा बैठकीचे आयोजन करावे लागेल, असे पोलिस निरीक्षक पवार म्हणाले. बैठकीस महापालिका, तसेच महावितरण आदी विभागांचे अधिकारी, परिसरातील राजकीय नेते, लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती जाणवली.

सिंहगड रस्ता - कायद्याची चौकट मोडू नका, नियमांचे पालन करा, आवाजाच्या आणि वेळेच्या मर्यादांचे योग्य तऱ्हेने पालन करा, वर्गणीची सक्ती नको, मंडळांनी नियमात कामे केली तर पोलिसांकडून नक्कीच सहकार्य असेल, असे आश्‍वासन सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिले. 

सिंहगड पोलिस ठाण्यांतर्गत दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. पोलिस निरीक्षक (गुन्हे) दादासाहेब गायकवाड, वाहतूकचे मच्छिंद्र आदलिंग, नगरसेवक हरिदास चरवड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, शिवाजी पासलकर आदी उपस्थित होते. 

मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना, तसेच ऑनलाइनदेखील सोय उपलब्ध आहे. अग्निशामकने उपाययोजना कराव्यात, वादग्रस्त देखावे टाळावेत, सेलिब्रेटी अथवा कोणी नेते मंडळींच्या भेटीचे पूर्वनियोजन पोलिसांना कळवावे, यासह विविध सूचना पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिल्या. 

वाहतुकीस अडथळा होईल असे कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत, तसेच मंडळाच्या किमान दहा कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमास हातभार लावून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे प्रमुख आदलिंग यांनी केले. प्रत्येक मंडळाने किमान दहा झाडे लावून ती जगवावीत. त्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन नगरसेवक हरिदास चरवड यांनी दिले. कार्यक्रमात मंडळांचे व विघ्नहर्ता न्यासचे पदाधिकारी, तसेच दक्षता समित्यांचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि नियोजन सचिन निवंगुणे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav Dahihandi mandal Law Rules Follow Police