पुण्याचा गणेशोत्सव ठरला 'दिशादर्शक'

bappa.jpg
bappa.jpg

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होणारा दिमाखदार गणेशोत्सव म्हणजे गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच. पण, यंदा कोरोनाच्या अनपेक्षित संकटाने पुण्याभोवती विळखा घातला. तो सोडविण्यासाठी पुणेकरांनी जिगरबरोबरच संयमही दाखविला. त्यांचा हा संयम गणेशोत्सवातही दिसून आला. तो उभ्या महाराष्ट्राला दिशादर्शक ठरला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सव आला की पुण्यातील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून जातात. विद्युत रोषणाई, मानाच्या गणपतींचा थाट, मिरवणुकांची डोळे दिपवणारी आरास, पारंपरिक वाद्यांचा गजर, कुठे मोदकाची लगबग तर कुठे सुरेल आरतीचा गजर. पुण्यातील गणेशोत्सवाबद्दल लिहायला शब्दही अपुरे पडतील, असा तो दिमाखदार सोहळा. दरवर्षी बेभान होणाऱ्या याच गणेशभक्तांनी यंदा संयमाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. कोरोनाचा कहर थांबता थांबत नसल्याने सर्वच सणांवर मर्यादा आल्या, तशाच त्या गणेशोत्सवावरही आल्या. मर्यादांच्या चौकटीत गणेशोत्सव साजरा करताना गणेश भक्तांत काहीशी नाराजी होतीच, पण आपण आपल्या पुण्याला वाचवायचे आहे, ही जबाबदारीची जाणीवही त्यांच्या डोळ्यात दिसत होती. शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी पुढाकार घेतला. 

पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी गणेशोत्सवापूर्वीच गणेश भक्तांसह पुणेकरांच्यात यंदाच्या गणेशोत्सवाबाबत सजगता आणली होती. 
सगळ्यांच्या सुरक्षेसाठी यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावयाचा आहे, ही जाणीव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या
कार्यकर्त्यांच्या ध्यानीमनी पक्की रुजली होती. या जाणिवेतूनच पुण्यातील उत्सव संयमाने उत्सव साजरा झाला. गणेशोत्सव मंडळांनी स्वतः आत्मचिंतन करून, लोकांच्या हिताला सुरक्षिततेला प्राधान्य दिले हे विशेष. अनेक मंडळांनी या वर्षी मांडवसुद्धा घातले नाहीत. गणेशोत्सवातील कार्यक्रमांना, मिरवणुकीला आणि जल्लोशाला बगल दिली. यातून शिल्लक राहिलेली वर्गणी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरासाठी खर्च केली. हे सारे पाहताना मन भावूक झाले. संकट येतानाच जबाबदारीची जाणीवसुद्धा घेऊन येते, याचा प्रत्यय आला. ज्या चौकातून मानाचे गणपती मार्गस्थ व्हायचे, त्या रस्त्यांवर आरोग्य विषयक जनजागृती, मास्क वाटप सुरू होते. ज्या रस्त्यावरून जल्लोशपूर्ण मिरवणुका निघायच्या. सजवलेले रथ दिसायचे. सगळा परिसर दहा दिवस दिव्यांच्या रोषणाईने उजळलेला असायचा. हे काही यावर्षी नव्हतं. होती ती फक्त पुणेकरांच्या सुरक्षेची.

पुणेकरांच्या आरोग्याची जाणीव आणि काळजी...हे वातावरण काहीसे अस्वस्थ करणारे नक्कीच होतं. पण हाच संयम हेच वातावरण कोरोना रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असेही मनोमन वाटत होते. गणेशोत्सवात नेहमीचा दिमाखदारपणा नसला तरी त्याच श्रद्धेने, ध्येयाने गणेशाकडे आरोग्यमय आराधना सुरू होती. सजग पुणेकरांच्या संयमाचे...जबाबदारीच्या जाणिवेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सलाम तुमच्या इच्छा व कार्यशक्तीला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com