
पुणे - गणेशोत्सवासाठी पुण्याहून आपापल्या गावी निघालेल्या नागरिकांसमोर तिकीट दरवाढीचे ‘विघ्न’ उभे राहिले आहे. मनमानी पद्धतीने तिकीट आकारणाऱ्या खासगी बस कंपनी चालकांवर राज्याच्या परिवहन विभागाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तरीही तो न जुमानता तिकिटाच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे. एसटी, रेल्वेच्या सर्व जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे गावी जाण्यासाठी खासगी बसवर अवलंबून असणाऱ्यांचा प्रवास महागला आहे.
पुण्याहून दररोज सुमारे ९०० हून अधिक ट्रॅव्हल्स महाराष्ट्राच्या विविध भागांत धावतात. यात मराठवाडा व विदर्भात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या अधिक आहे. काही प्रवाशांनी आधीच बुकिंग केल्याने आता उर्वरित जागांसाठी ट्रॅव्हल्स चालकांनी भाडे वाढविले आहे. त्यामुळे प्रवाशांना गणेशोत्सवातील प्रवास चांगलाच महागात पडणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दर वर्षीप्रमाणे यंदाही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार किरकोळ स्वरूपात कारवाई केली जाते.
नियमांचे उल्लंघन....
राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी संवर्गातील बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडे निश्चित केलेले आहे. त्यानुसार खासगी कंत्राटी वाहनाचे अथवा ट्रॅव्हल्सचे तिकीट ठरविण्यात आले आहे. एसटीच्या तिकिटापेक्षा ५० टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम आकारण्यास ट्रॅव्हल्सला परवानगी दिली आहे. मात्र काही ट्रॅव्हल्स चालकांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केली आहे.
येथे करा तक्रार
प्रवास करताना जास्त तिकीट घेतल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी आरटीओकडे ई-मेल अथवा कार्यालयीन वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ०२०-२६०५८०८० किंवा ०२०-२६०५८०९० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, rto.12-mh@gov.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.
ट्रॅव्हल्स चालकांनी नियमानुसार तिकिटाची आकारणी करणे अपेक्षित आहे. ज्या चालकांनी अधिकचे भाडे आकारले आहे, त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. प्रवाशांनीही असा अनुभव आल्यास त्याबाबतची तक्रार करावी. त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे