gangs arrested in hyprofile area theft case Pistol seized from Sindh Society crime pune police
gangs arrested in hyprofile area theft case Pistol seized from Sindh Society crime pune policeesakal

Pune Crime News : हायप्रोफाईल भागात घरफोड्या करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

सिंध सोसायटीतून चोरीस गेलेले पिस्तूल जप्त

पुणे : आलिशान मोटारीतून येऊन हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक कोटी २१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

त्यामध्ये औंध भागातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून चोरीस गेलेल्या पिस्तुलाचाही समावेश आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार आणि नारायण शिरगांवकर यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

टोळीप्रमुख महम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबिन हुड (रा. जोगिया, थाना पुपरी, जि. सीतामढी, बिहार) याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा आणि तमिळनाडूमध्ये गँगस्टर अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट आणि घरफोडी असे एकूण २७ गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यात शमीम शेख (मूळ रा. बिहार), अब्रार शेख आणि राजू म्हात्रे (दोघे रा. धारावी, मुंबई) यांना अटक केली आहे. तर, सुनील यादव, पुनीत यादव आणि राजेश यादव (तिघे रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) हे तमिळनाडू पोलिसांच्या कोठडीत आहेत.

सिंध सोसायटीमधील बांधकाम व्यावसायिक जगदीश कदम यांच्या घरातून परदेशी बनावटीचे पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे, तीन घड्याळे, चार तोळ्याची सोनसाखळी आणि दोन लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती.

याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने तपास पथके नेमली होती. तपासादरम्यान, आरोपींनी आलिशान मोटारीला बनावट नंबर प्लेट लावून घरफोडी केल्याचे समोर आले.

पोलिसांनी पुणे-नाशिक मार्गावरील दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चोरट्यांनी दुसऱ्या शहरात गेल्यानंतर मोटारीची नंबरप्लेट बदलली होती. त्यामुळे पोलिसांना एका टोल नाक्यावरून मोटारीचा मूळ क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यात रॉबिन हुड आणि साथीदारांनी सिंध सोसायटीमध्ये घरफोडी केल्याचे समोर आले.

गुन्हे शाखेची दोन पथके गाजियाबादला रवाना करण्यात आली. परंतु मुख्य सूत्रधार रॉबिन हुड हा दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाना राज्यात राहण्याचे ठिकाण बदलत होता. सलग आठ दिवस आरोपींचा माग काढत पोलिस पंजाबमधील जालंधरला पोचले. तेथे पोलिसांनी बिगारी कामगारांचा वेश परिधान करून रॉबिन हुड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून

गुन्ह्यात वापरलेली आलिशान मोटार, पिस्तूल आणि सोन्याचे दागिने जप्त केले. आलिशान मोटार ही धनपाल सिंग याची असून, त्याच्याविरुद्ध दिल्लीत गॅंगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे. रॉबिन हुड हा चोरलेली घड्याळे मुंबईतील मित्र शमीम शेख याला विक्रीसाठी देत होता.

त्यावरून पोलिसांनी त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून सिंध सोसायटीमधून चोरीस गेलेली तीन आणि विशाखापट्टणम येथील घरफोडीमधील सात अशी एकूण १० किमती घड्याळे जप्त केली.

चोरीच्या पैशांमधून समाजसेवा

आरोपी रॉबिन हुड याने घरफोड्या करून मिळालेल्या पैशांतून काही गावांमध्ये रस्ते केले आहेत. तसेच, काही गरीब मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत केली आहे. चोरीच्या पैशांतून तो सामाजिक कार्य करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे काही व्हिडिओ युट्यूबवर असून, याबाबत तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com