सोशल मीडियावरून पुन्हा ‘गॅंगवार’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पिंपरी - शहरातील सोन्या काळभोर टोळी आणि रावण टोळी यांच्यात पुन्हा सोशल मीडियावर गॅंगवार सुरू झाले आहे. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांना ‘बघून’ घेण्याची भाषा केली जात असताना पोलिस याबाबत मात्र अनभिज्ञ आहेत.

पिंपरी - शहरातील सोन्या काळभोर टोळी आणि रावण टोळी यांच्यात पुन्हा सोशल मीडियावर गॅंगवार सुरू झाले आहे. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांना ‘बघून’ घेण्याची भाषा केली जात असताना पोलिस याबाबत मात्र अनभिज्ञ आहेत.

रावण गॅंगचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खून झाला होता. याप्रकरणी सोन्या काळभोरसह त्याच्या साथीदारांना अटक झाली. सध्या हे आरोपी कोल्हापूरच्या कारागृहात आहेत. अनिकेतच्या खुनानंतर आता या दोन्ही टोळ्यांमध्ये सोशल मीडियावरून ‘गॅंगवार’ उसळल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर या टोळ्यांनी सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट काढून घेतल्या. मात्र, गेल्या महिनाभरापासून या दोन्ही टोळ्यांमध्ये पुन्हा सोशल गॅंगवार सुरू झाले आहे. रावण गॅंगने २५ ऑगस्ट आणि १४ सप्टेंबरला प्रतिस्पर्धी टोळीला संपविण्याची भाषा केली होती. तर सोन्या काळभोर टोळीने २५ व ३१ ऑगस्ट आणि ८, ९, १० सप्टेंबरला प्रतिस्पर्धी टोळीला धमकीचे मेसेज केले होते. मात्र, पोलिसांकडून या टोळ्यांच्या कारवाईकडे वारंवार दुर्लक्ष होताना दिसत आहे.

धमकीच नाही, कृतीसुद्धा
या टोळ्या फक्‍त सोशल मीडियावरून धमक्‍या देत नसून त्याची कृतीही करत आहेत. दोन दिवसांपूर्वी रावण गॅंगचे काही सदस्य सोन्या काळभोरच्या घराच्या परिसरात घुसले होते. मात्र, पोलिस वेळीच पोचल्याने त्यांनी आपल्या दुचाकी तिथेच टाकून पळ काढला. आता या दुचाकी निगडी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

गॅंगवार दृष्टिक्षेपात
सोशल मीडियावरून गॅंगचा प्रचार
गुंडांकडून स्मार्टफोनचा वापर
गुंड टोळ्यांचे सोशल मीडियावरून स्मार्ट नेटवर्क
नवीन आयुक्‍तालयात सायबर सेलचा अभाव

सर्व सोशल मीडिया पोलिस पाहू शकत नाही. मात्र, असा काही प्रकार असेल तर पोलिस निश्‍चितच संबंधितांवर कारवाई करतील.
- सतीश पाटील, सहायक आयुक्‍त, गुन्हे शाखा

Web Title: Gangwar on social media