मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा : गिरीश बापट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पुणे : डीजे सिस्टीमसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेवून विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाची शांततेत सांगता करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे. 

पुणे : डीजे सिस्टीमसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेवून विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाची शांततेत सांगता करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे. 

न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीत "डीजे'चा वापर करण्यावरील मनाई कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे शहरातील काही मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि गणेश मूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री बापट यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी महापौर मुक्ता टिळक या उपस्थित होत्या. "उत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयीन लढाई ही न्यायालयातच लढावी. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे काही व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यांचे नुकसान आणि मिरवणूक या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. राज्य सरकार न्यायालयात योग्य बाजू मांडत आहे. न्यायालयाचे आदेश पाळणे बंधनकारक असून, पोलिसांनीही कायदा आणि सुव्यवस्था राखताना कोठेही बळाचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश मूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय मंडळांनी घेतल्याबाबत आपल्याकडे काही माहिती आली नाही. स्पीकरमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास होतो. त्यामुळे मिरवणूक ही साउंड सिस्टीममुक्त असावी, ही भूमिका आहे. मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी सर्व पक्षाच्या शहराध्यक्षांना विनंती केली आहे. न्यायालयाचे आदेश केवळ गणेशोत्सवासाठीच नाही तर सर्वधर्मीय उत्सव, सणांसाठीदेखील आहेत,'' असे बापट यांनी सांगितले. 

Web Title: Ganpati Mandal should respect the court's decision: Girish Bapat