बाप्पाच्या दुनियेत रमला चिमुकला

अवधूत कुलकर्णी
सोमवार, 16 एप्रिल 2018

बाप्पा माझा लाडका
‘‘मला केवळ गणपती हाच देव आवडतो. त्याची मूर्ती बनविण्यास मला खूप आवडते,’’ असे समर्थने आवर्जून सांगितले.

पिंपरी - चिंचवड येथील पाचवर्षीय चिमुकला समर्थ पाटीलला गणेशमूर्ती साकारण्याचा आणि प्रतिमा व मूर्ती  संकलनाचा अनोखा छंद जडला आहे. लग्नपत्रिका तसेच विविध प्रकारे एकूण अडीचशे प्रतिमांचा संग्रह त्याच्याकडे आहे.

तो दीड वर्षांचा असतानाच घरातील भिंतींवर पेन्सिलच्या साह्याने गणपतीचीच चित्रे रेखाटू लागला. त्याचे आजोबा प्रमोद पाचपुते यांचे चिंचवड येथे पूजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. तेथे विविध वस्तूंवर असलेल्या गणपतीच्या चित्रांनी त्याला आकर्षित केले. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या विविध गणेश प्रतिमा त्याने संकलित केल्या. या प्रतिमा त्याने कोऱ्या कागदावर चिकटविल्या. त्यातूनच त्याची आवड वाढत गेली. पुढे घरी येणाऱ्या लग्न अथवा इतर धार्मिक कार्यक्रमांच्या पत्रिकांवरील गणपतीची चित्रे संकलित करण्याचा छंद त्याला जडला. पाठोपाठ गणेशमूर्ती संकलनही करू लागला. त्यासाठी त्याला वडील शैलेश आणि आजोबा पाचपुते यांनी सहकार्य केले. 

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी समर्थने कोठेही प्रशिक्षण घेतलेले नसल्याचे त्याची आई नीलिमा यांनी स्पष्ट केले. यू-ट्यूब वाहिनीवर गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक पाहून तो ते शिकला. सुरवातीला त्याच्या आईने त्याला गणेशमूर्तीसाठी कणीक दिली. त्याला खरेच गणेशमूर्ती तयार करता येते हे त्यातून तपासले. त्यानंतर शाडूची माती आणून दिली. त्यापासून त्याने चार-पाच मूर्ती तयार केल्या आहेत. काही बाजारातून आणलेल्या मूर्तींनाही त्याने रंगकाम केले आहे. 

त्याचे वडील शैलेश यांचे चिंचवड येथे आयुर्वेदिक औषधे विक्रीचे दुकान आहे. तर, आई नीलिमा गृहिणी आहे.

समर्थला गणपतीची गाणी म्हणता येतात. गणपती अथर्वशीर्ष, गणेशस्तोत्र त्याला तोंडपाठ आहे. रोज सकाळी तो गणपतीच्या प्रतिमेची पूजाही न चुकता करतो.
- नीलिमा पाटील, चिंचवड

Web Title: ganpati murti collection samarth patil