बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर

Tulshibaug Ganpati
Tulshibaug Ganpati

पुणे : आसमंतात घुमनारा शंखनाद... इमारतींवरून होणारी फुलांची उधळण... सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांचा पायघड्या... वेगवेगळ्या तालांवरील ढोल-ताशांचा दणदणाट... 'मोरया'चा जयघोष करत वादकांना दिली जाणारी उत्स्फूर्त दाद... उकाडा असला तरी क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी... नानाविध रूपातील गणरायाचा थाट आणि हे सगळे अनुभवण्यासाठी लोटलेला जनसागर... अशा आनंददायी वातावरणात पुणेकरांनी मानाच्या गणपतींना मंगळवारी निरोप दिला. सकाळी साडेदहापासून सायंकाळी साडेसातपर्यंत मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक चालली.

(मानाचा पहिला : कसबा गणपती)
सनई वादनाने सुरवात
कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीने पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. या वेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी आदी मान्यवर उपस्थित होते. चांदीच्या पालखीतून "श्रीं'ची मिरवणूक काढण्यात आली. प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन, देवळणकर बंधूंच्या नगारावादनाने मिरवणूक मंडईतून लक्ष्मी रस्त्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. प्रभात बॅंड, रमणबाग प्रशाला, कामायनी विद्या मंदिरचे ढोल-ताशा पथकांनी जल्लोशपूर्ण वादन केले. महिलांचे पथकही मिरवणुकीत सहभागी झाले होते. 
मिरवणूकीचा प्रारंभ : सकाळी 10:00

(मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्वरी)
'स्त्री'च्या धाडसाचे दर्शन
फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीत फेटा घातलेली तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बाप्पाची मूर्ती मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. फुलांची उधळण करत मिरवणुकीला प्रारंभ झाला. ताल, शिवमुद्रा, शौर्य, न्यू गंधर्व बँड यांनी मंडळाच्या मिरवणुकीत रंगत आणली. त्यामुळे अनेकांनी वादन सुरु असताना ठेका धरला. याचवेळी बालशिवाजीच्या वेशातील लहान मुलांसोबत अनेकांनी 'सेल्फी'सुद्धा घेतले. स्त्री शक्तीच्या धाडसाचे दर्शनही या वेळी घडवून आणले.
मिरवणूकीचा प्रारंभ : सकाळी 11.00

(मानाचा तिसरा: गुरुजी तालीम)
गुलालाची उधळण
नेहमीप्रमाणे यंदाही गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु झाली. चेतक, शिवगर्जना या पथकांबरोबरच नगाराबंधूंचे सनई चौघडा गणेश भक्तांची गर्दी खेचून घेणारा ठरला. पारंपरिक वेशभूषेतील महिला लेझीम खेळ सादर करत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मुशकावर विराजमान झालेला बाप्पा आणि फुलांनी सजवलेला रथ आकर्षक ठरला. मंडळाने यंदाही बाप्पाभोवती सुरक्षारक्षकांचे कडे केले होते.
मिरवणूकीचा प्रारंभ : दुपारी 12:15

(मानाचा चौथा : तुळशीबाग गणपती) 
भव्य मूर्ती अन् भव्य रथ 
फुगड्या, कागदी फुलांची उधळण, लहानांबरोबरच मोठ्याचा सहभाग असलेले तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रस्त्यावर आले. नानाविध रंगांच्या फुलांनी सजवलेला गरुड रथ आणि त्यावर विराजमान बाप्पांची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती. लोणकर बंधूच्या नगरावादनाने मिरवणुकीत रंगत आणली. यापाठोपाठ आलेल्या स्वरूपवर्धिनी पथकातील लहान मुलांनी विविध खेळ तर मोठ्या गटाने वादन करून आनंदाचे रंग भरले. मल्लखांबाचे प्रात्यक्षिक, श्री गजलक्ष्मीचे ढोल ताशा वादन, हिंद तरुण मंडळाचे ढोल व लेझीम वादन यांनीही तितकीच रंगत आणली.
मिरवणूकीचा प्रारंभ : दुपारी 12: 45

(केसरीवाडा गणपती)
'जय श्री राम' 
घोषणांतून गर्दीला मिळाली ऊर्जा
बिडवे बंधूच्या नादमधुर सनई वादनाने केसरीवाडा 
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. त्यानंतर समर्थ पथकाने मुलींची तलवार बाजीची प्रात्यक्षिके दाखवून स्त्री शक्तीकडे लक्ष वेधले. पुणेरी पगडी घातलेले वादक या पथकात सहभागी झाले होते. 125 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांच्या भेटीवर आधारित देखावा त्यांच्या वेशभूषेतच कलाकारांनी सादर केला. शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने ही दमदार वादन केले तर श्रीराम पथकाने "जय श्री राम' अशा घोषणा देत वादनात अधिक रंगत आणली.
मिरवणूकीचा प्रारंभ : दुपारी 1:10

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com