कचरा संकलन केंद्रास बावधनमध्ये विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

बावधन - वनाजजवळील कचरा संकलन केंद्र बावधन खुर्दमध्ये स्थलांतरित करण्यास भूगाव, बावधनमधील स्थानिक रहिवासी, सोसायट्यांतील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जीव गेला तरी चालेल; परंतु हे केंद्र बावधनमध्ये येऊ द्यायचे नाही, असा निर्धार या वेळी नागरिकांनी केला.

बावधन - वनाजजवळील कचरा संकलन केंद्र बावधन खुर्दमध्ये स्थलांतरित करण्यास भूगाव, बावधनमधील स्थानिक रहिवासी, सोसायट्यांतील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जीव गेला तरी चालेल; परंतु हे केंद्र बावधनमध्ये येऊ द्यायचे नाही, असा निर्धार या वेळी नागरिकांनी केला.

शंभर मीटर अंतरावरील रामनदीजवळ, राष्ट्रीय महामार्गालगत, भर लोकवस्तीत हे केंद्र सुरू करण्याचे भलतेच वेड पालिकेला कसे सूचले, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. भूगावजवळ बावधन खुर्दच्या हद्दीत वनाजजवळील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करणार हे ऐकल्यानंतर दोन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन बावधन कचरा डेपो विरोधी कृती समितीची स्थापना केली. भूगावला सर्व जण एकत्र आले. या वेळी माजी खासदार प्रदीप रावत, घनकचरा विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, नगरसेवक किरण दगडे, दिलीप वेडे, अल्पना वरपे, दगडूकाका करंजावणे, विजय सातपुते, बाळासाहेब शेडगे, रवी पंडित, नीलेश ओसवाल, संदीप करपे, अनिल करंजावणे, सोहन झुरीया, विजय मोहोळ, ॲड. सुशांत पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

येथे कचरा संकलन केंद्र सुरू करण्याबाबत प्रशासनाने आम्हा नगरसेवकांची दिशाभूल केली आहे. बावधनला एक प्रकल्प असताना दुसऱ्याची गरज नाही. वनाजलाच अठ्ठावीस एकरातील १२.२ एकर जागा मेट्रोला दिली आहे. उरलेल्या जागेतील दोन एकर जागा कचरा संकलनासाठी उपयोगात आणावी. कुठल्याही परिस्थितीत येथे कचरा डेपो होऊ देणार नाही, असा निर्धार तिन्ही नगरसेवकांनी व्यक्त केला. अनिल चोंधे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंजावणे यांनी आभार मानले.

शहरात ४८ ठिकाणी कचरा संकलन केंद्रे आहेत. वारजे आणि कोथरूड प्रभागातील कचरा येथे संकलित करणार आहे. त्याचा वास येणार नाही. नागरिकांच्या भावना महापालिकेत मांडून योग्य ती कार्यवाही करू.
- ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त, घनकचरा विभाग, महापालिका

या कचरा डेपोमुळे रामनदी पुन्हा प्रदूषित होईल. अगोदरच वाहतुकीची कोंडी असलेल्या या भागात वाहतुकीवरही ताण येईल. पर्यावरणाचाही ऱ्हास होईल. 
- रवी पंडित, रहिवाशी

बावधनला कचरा डेपो आणताना पालिकेने नक्की कशाचा विचार केलाय, हेच समजत नाही. एकीकडे रामनदी पुनर्जीवित करण्याचे काम होत असताना पालिका नदीचा नाला करू पाहत आहे.
- संदीप करपे, रहिवाशी

Web Title: Garbage Collection Center oppose by bavdhan people