कचरा आजपासून उचलणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

डेपोला लागलेली आग बहुतांश प्रमाणात आटोक्‍यात
पुणे - फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला लागलेली आग बहुतांश प्रमाणात आटोक्‍यात येत असल्याने शुक्रवार (ता. २१) पासून तेथे कचरा टाकला जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शहराच्या सर्व भागांमधील कचरा उचलला जाईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, कुठेही कचरा साठू दिलेला नसून, शक्‍य तेवढा कचरा रोजच्या रोज उचलण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

गेल्या आठवडाभर ज्या-ज्या प्रकल्पांमध्ये कचरा नेला जात होता, ते प्रमाण कायम राहील, असेही घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. डेपोला आग लागल्याने सहा दिवसांपासून डेपोत कचरा टाकणे बंद केले होते, त्यामुळे शहरातील कचरा उचलण्यात येत नव्हता. 

गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून, अनेक भागांतील कचराकुंड्या भरून वाहत आहेत. दुसरीकडे आणखी आठवडाभर तरी आग आटोक्‍यात येण्याची शक्‍यता नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही ग्रामस्थांनी कचरा गाड्या येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने नेमका कचरा कधी उचलला जाणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. 

कचरा उचलण्याबाबत सूचना 
कचऱ्याचा प्रश्‍न न सोडवल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी दिला होता. तसेच, बुधवारी आंदोलनही केले. साठलेला कचरा त्वरित उचलण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली होती. या पार्श्‍वभूमीवर महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी घनकचरा व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचरा उचलण्याबाबत सूचना केली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून सर्व भागांतील कचरा उचलणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: garbage collection today