राजगुरुनगरमध्ये नागरिकांना कचराडेपोतील दुर्गंधीचा त्रास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

राजगुरुनगर - राजगुरुनगरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने स्मशानभूमीजवळील कचराडेपोच्या दुर्गंधीचा त्रास राजगुरुनगरवासीयांना भोगावा लागत आहे.

राजगुरुनगर - राजगुरुनगरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडल्याने स्मशानभूमीजवळील कचराडेपोच्या दुर्गंधीचा त्रास राजगुरुनगरवासीयांना भोगावा लागत आहे.

राजगुरुनगरचा कचरा डेपो पूर्वी गढी मैदानाजवळ होता. अनेक वर्षे तेथील नागरिकांनी दुर्गंधी आणि इतर त्रास सहन केल्यावर तो स्मशानभूमीजवळ हलविण्यात आला. त्याठिकाणी कचऱ्याच्या गाड्या खाली होतात आणि नंतर तेथून मोठे डंपर भरून तो पुढे पाठविला जातो. जवळच असलेल्या रस्त्यावरून जाणारे प्रवासी, पोलिस ठाणे आणि स्मशानभूमीत येणारे नागरिक यांना अनेक वर्षांपासून त्याच्या असह्य दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत आहे. विशेषतः पावसाळा आणि त्यानंतरच्या दोन-तीन महिन्यांत दुर्गंधीची तीव्रता जास्त असते. त्याठिकाणी भिकारी शोधाशोध करीत असतात. कुत्री आणि डुकरे फिरत असतात. बऱ्याचदा कचरा शेजारील ओढ्यात पडतो आणि त्याद्वारे नदीतही जातो. पूर्वी ग्रामपंचायतीला निधी मिळण्याचे मार्ग नसल्याने नाइलाजाने लोकांनी वर्षानुवर्षे हा त्रास सहन केला. मात्र, आता तो होऊ नये, अशी नागरिकांची भावना आहे. राजगुरुनगरला नगर परिषद झाल्यावर दोन वर्षांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे ठरले. त्यानुसार २०१६ साली सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाल्याचे अद्याप दिसत नाही.

नगरसेवकांना आश्‍वासनाचा विसर
कचरा उचलण्याचा ठेका नगर परिषदेने दिल्यानंतर गावात ठिकठिकाणी दिसणारा कचरा आता तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. पण, मुख्य डेपोचा प्रश्न मात्र भिजत पडला आहे. घनकचरा प्रकल्प राबविण्याचे आश्वासन सर्वांनी निवडणुकीत दिले होते. पण, आता नगरसेवकांना त्याचा विसर पडला आहे.

Web Title: garbage Depo Pollution