उरुळीत कचरा डेपोची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

फुरसुंगी - कचरा डेपो विरोधी आंदोलन करणाऱ्या उरूळी देवाची, फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी बुधवारी कचरा डेपोची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. खासदार सुप्रिया सुळे यादेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

फुरसुंगी - कचरा डेपो विरोधी आंदोलन करणाऱ्या उरूळी देवाची, फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी बुधवारी कचरा डेपोची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. खासदार सुप्रिया सुळे यादेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

पुणे महापालिकेने कचरा डेपो कायमचा बंद करावा म्हणून ग्रामस्थ सतरा दिवसांपासून डेपोवर आंदोलन करत आहेत. आज ग्रामस्थांनी सासवड रस्त्यावरील मंतरवाडी चौकापासून कचरा डेपोची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, राहुल शेवाळे, पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे, अनिल टिळेकर, दिलीप मेहता यांच्यासह दोन्ही गावांचे ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. सुमारे एक तास चाललेल्या या अंत्ययात्रेत ग्रामस्थांनी महापौर, आयुक्त यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सुळे म्हणाल्या, ‘‘महापालिका प्रशासन कचरा प्रश्‍नाबाबत गंभीर नाही. पालिका निवडणुकीत यांनीच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. सतरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 

अधिकाऱ्यांना आज भेटणार
कचराप्रश्‍नी महापालिकेचे अधिकारी व मुख्यमंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. ग्रामस्थांचा प्रश्न सुटला पाहिजे व कचरा कोंडी फुटली पाहिजे, यासाठी गुरुवारी ग्रामस्थांसह पुण्यात जाऊन महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शहरात कचरा साठून आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा वेळी महापौर, पालकमंत्री शहरवासीयांना कचऱ्यात सोडून परदेशात निघून गेले. याबद्दल मी पालिका प्रशासनाचा निषेध करते. नऊ महिन्यांत कचरा डेपो बंद करू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षे झाली तरी काहीच केले नाही.
- सुप्रिया सुळे, खासदार

Web Title: Garbage Disposal issue