उघड्यावर जळतोय कचरा

हडपसर - जुन्या कालव्यालगत अशाप्रकारे कचरा जाळला जातो.
हडपसर - जुन्या कालव्यालगत अशाप्रकारे कचरा जाळला जातो.

पुणे - हडपसर परिसरात अस्वच्छतेचा प्रश्‍न चांगलाच ऐरणीवर आला असताना नागरिकांबरोबर प्रशासनही वाढत्या प्रदूषणाला हातभार लावत आहे. कचरा डंपिंग ग्राउंडवर जाण्याऐवजी तो अनेक ठिकाणी जागेवरच जाळण्यात येत आहे. ओला कचरा लवकर जळत नसल्यामुळे सकाळपासूनच सर्वत्र धुराचे लोट पाहावयास मिळत आहेत. सफाई कामगारच गोळा केलेला कचरा राजरोस जाळताना दिसत आहेत.

कचऱ्यातील प्लॅस्टिक पिशव्या, पाणी पाऊच, रबर, पाणी बॉटल्स, ओला कचरा तासन्‌तास जळत राहिल्यामुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिका हद्दीत कचरा जाळणे हा गंभीर प्रकार आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २००० नुसार शहर हद्दीत कचरा जाळणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला आहे. पालिकेचे सफाई कामगारच शहरात कचरा जाळत असल्यामुळे पालिका त्यांच्यावर काय कारवाई करणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

याबाबत डॉ. शैलेश शहा म्हणाले, की उघड्यावर कचरा जाळणे म्हणजे आजारास निमंत्रण देणे आहे. यामुळे सर्दी, शिंका येणे, डोके दुखणे यासह अस्थमासारखे गंभीर आजार होऊ शकतात. कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे दमा, अस्थमाचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. फुफ्फुसाचे आजारही यामुळे होऊ शकतात. यासाठी कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पर्यावरण प्रेमी माधुरी जगताप म्हणाल्या, की कचरा जाळण्यामुळे ओझोनच्या थरावर परिणाम होतो. ओझोनचा थर कमी झाल्यामुळे पॄथ्वी वरील उष्णता वाढत चालली आहे. आपण सर्व जण त्याचे परिणाम भोगत आहोत. कचरा उत्पादन कमी करा. यावर एक साधा उपाय आहे तो म्हणजे, प्रथम कचरा तयार होतो तेथेच तो वेगवेगळा करणे. कुजणारा कचरा म्हणजे भाज्यांचा, फ़ळांचा कचरा, उरलेले अन्न, खरकटे, झाडांची पाने, फांद्या, कांदा-लसणाची साले, करवंट्या, नखे, केस; थोडक्‍यात प्राणी आणि वनस्पतीपासून निर्माण झालेला कचरा याचे आपण गांडूळखत प्रकल्प, बायोक्‍लचर प्रकल्प, कंपोस्ट खत अशा निरनिराळ्या प्रक्रियांपैकी एक वापरून सेंद्रिय खत बनवू शकतो. यासाठी नागरिकांचे प्रबोधन महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com