प्रकल्पच कचऱ्यात ! 

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे  - कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी त्यावरील प्रक्रिया प्रकल्प वाढविण्याचे नियोजन महापालिका करीत असतानाच, रामटेकडीतील तब्बल सातशे टन क्षमतेचा रोकेम प्रकल्प गुंडाळला जाणार आहे. यातून वीजनिर्मितीच होत नसल्याने तो तोट्यात आला आहे. एखाद्या प्रकल्पाला किरकोळ आग लागल्यानंतर तो जाणीवपूर्वक सुरू करण्यात येत नसल्याचे दिसते. यापूर्वी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील एक हजार टन क्षमतेच्या हंजर प्रकल्पाला आग लागल्यानंतर तो बंद केला. त्यामुळे कचरा प्रकल्पाला आग लागल्यानंतर तो बंद पडत असल्याचे दिसते. 

पुणे  - कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी त्यावरील प्रक्रिया प्रकल्प वाढविण्याचे नियोजन महापालिका करीत असतानाच, रामटेकडीतील तब्बल सातशे टन क्षमतेचा रोकेम प्रकल्प गुंडाळला जाणार आहे. यातून वीजनिर्मितीच होत नसल्याने तो तोट्यात आला आहे. एखाद्या प्रकल्पाला किरकोळ आग लागल्यानंतर तो जाणीवपूर्वक सुरू करण्यात येत नसल्याचे दिसते. यापूर्वी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील एक हजार टन क्षमतेच्या हंजर प्रकल्पाला आग लागल्यानंतर तो बंद केला. त्यामुळे कचरा प्रकल्पाला आग लागल्यानंतर तो बंद पडत असल्याचे दिसते. 

शहरात जमा होणाऱ्या बहुतांशी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने प्रकल्प उभारले आहेत. त्यात, 2011 मध्ये रामटेकडीत रोकेम प्रकल्प उभारला. हा प्रकल्प खासगीकरणातून चालविण्यात येणार असल्याने त्याचा खर्च संबंधित कंपनीने केला. मात्र, सातशे टन क्षमतेच्या या प्रकल्पाचा उद्देश वीजनिर्मितीचा आहे. परंतु, गेल्या सात वर्षांत यातून एक मेगावॉटही वीजनिर्मिती झाली नाही. मुळात, सातशेऐवजी तीनशे ते साडेतीनशे टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते. त्यातही पावसाळ्यात प्रकल्प काही दिवस बंद ठेवावा लागतो. त्यावरून महापालिका आणि कंपनीमध्ये वादही झाला; पण कंपनीची तक्रार कायम राहिली. प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत प्रयत्न झाले; मात्र ते कागदोपत्रीच राहिले. त्यामुळे आजतागायत हा प्रकल्प एक दिवसही पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकला नाही. त्यातच, प्रकल्पात 20 दिवसांपूर्वी आगीची घटना घडली, तेव्हापासून तो बंद आहे. या घटनेनंतर तो आठवड्यात सुरू केला जाईल, असे महापालिकेने जाहीर केले. मात्र तो अद्याप सुरू झाला नाही. अर्थात, तोट्यातील हा प्रकल्प लवकरच गुंडाळला जाण्याची शक्‍यता महापालिका प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली. 

रोकेम प्रकल्पाला आग लागल्याने दुरुस्तीसाठी तो बंद आहे. तो सुरू करण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली असून, तो कार्यान्वित होईल. हा प्रकल्प खासगी कंपनीचा असल्याने त्यांच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, प्रकल्प बंद करण्यासंदर्भात व्यवस्थापनाने कळविले नाही. 
- सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका 

कंपनीला आर्थिक फटका 
रोकेम प्रकल्प खासगीकरणातून उभारला असला तरी, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार येथे प्रक्रिया होणाऱ्या कचऱ्यासाठी दर निश्‍चित केले आहेत. प्रत्येक टनासाठी तीनशे रुपये दिले जातात. हा दर वाढवून देण्याची कंपनीची मागणी आहे. त्यावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, वीजनिर्मितीच होत नसल्याने कंपनीला उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे प्रकल्प उभारल्यापासून तो तोट्यात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा प्रयत्नही फसला असून, त्याचाही आर्थिक फटका कंपनीला बसला आहे. यातून कंपनीला सावरणे शक्‍य नसल्यानेच तो बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे महापालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोच्या आवारात 2010 मध्ये तब्बल 19 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या हंजर प्रकल्पाला 2014 मध्ये मोठी आग लागली. तेव्हापासून तो बंद पडला. त्यानंतर तो सुरू केला नाही. या प्रकल्पाचा उद्देश खतनिर्मिती आणि इंधन विटा तयार करण्याचा होता. यातून खतनिर्मिती केली; पण ती धोकादायक असल्याचे आढळल्याने या प्रकल्पाकडील खत विक्रीचा परवाना रद्द केला. त्यामुळे हा प्रकल्प तोट्यात गेल्याने तो बंद केल्याची आठवण महापालिकेतील अधिकाऱ्याने सांगितली. या घटनेवरून रोकेमला टाळे लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

रोकेम प्रकल्पाची उभारणी  2011 
------------------------------ 
प्रकल्पाची क्षमता  700 टन 
----------------------------- 
सध्या प्रक्रिया  350 टन 

 

Web Title: garbage issue in PMC