कचरा कोंडी संपता संपेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

शहरात गोळा होणाऱ्या ओल्या आणि सुक्‍या कचऱ्यावर विविध प्रकारे प्रक्रिया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावर कचरा फारसा शिल्लक राहणार नाही, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुरू असलेल्या आंदोलनातून लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. सुरू असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठीही उपाययोजना सुरू केल्या आहेत. 
-सुरेश जगताप, प्रमुख,  घनकचरा व व्यवस्थापन विभाग

पुणे - उरुळी देवाची आणि फुरसुंगीत कचऱ्याच्या प्रश्‍नावर सुरू असलेले आंदोलन आणि महापालिकेचे बंद पडलेले प्रक्रिया प्रकल्प, यामुळे शहरात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठू लागले आहे. कचरा हलविण्यासाठी प्रशासनाचे सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडू लागल्याचे रविवारी पाहावयास मिळाले. 

फुरसुंगी डेपोत कचरा डेपोला आग लागल्यानंतर २१ एप्रिलपासून परिसरातील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कचरा डेपोत एक किलोही कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या बाबत महापौर मुक्ता टिळक आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी केलेली चर्चा शनिवारी अयशस्वी ठरली आहे.

शहरात दररोज सुमारे १६०० टन कचरा जमा होतो. हंजर आणि दिशा प्रकल्प बंद आहेत. नोबेल प्रकल्प अपेक्षेपेक्षा कमी क्षमतेने चालत आहे. पाच- दहा टनांचे अनेक प्रकल्प बंद आहेत. त्यामुळे शहरात गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे. ओला कचरा शेतकऱ्यांकडे पाठविण्यात येत आहे. तसेच काही कचरा बायोगॅस प्रकल्पांमध्येही पाठविण्यात येत आहे. परंतु तेथील २६ पैकी ४ प्रकल्पच सुरू आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर कचरा गोळा करण्याच्या कामावरही परिणाम झाला आहे. कचरा वेचकांकडून गोळा होणारा सुका कचरा काही प्रमाणात भंगार व्यावसायिकांकडे जात आहे. ओला कचराही काही प्रमाणात जिरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु शिल्लक राहणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे रस्त्याचे ढीग साठू लागले आहेत. परिणामी परिसरातील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Garbage issue pune city