‘बाबूगिरी’मुळे सुतारदऱ्यात नागरिक आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नागरिकांच्या मागण्या

  • नाल्यातील ड्रेनेजचे पाणी तातडीने बंद करा
  • नादुरुस्त वाहिन्या बदला
  • तुटलेले चेंबर दुरुस्त करा
  • नालेसफाई करा
  • राडारोडा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा
  • सुतारदऱ्यातील नालेसफाईवरील खर्चाची माहिती जाहीर करा

पौड रस्ता - नाल्यात वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे येणारी दुर्गंधी, त्यामुळे होणारी साथीच्या आजारांची लागण, यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करणाऱ्या कोथरूडमधील नागरिकांना ‘बाबूगिरी’चा प्रत्यय ते आक्रमक झाले. आरोग्य निरीक्षक संतोष ताटकर यांना घेराव घातल्यानंतर गुरुवारी (ता. २५) सकाळी वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष स्थळ पाहणीला येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, कनिष्ठ अभियंत्यांना पाठवून दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला.

संजय कोलवणकर यांनी सिटिझन ॲपवर सांडपाणी वाहिनीचे पाणी नाल्यातून वाहत असल्याची तक्रार केली होती. हा नाला पावसाळ्यापूर्वी साफ करण्यात आला नाही. आता तिथे गटार वाहत आहे. हेच पाणी नदीमध्ये जाते, यावर तातडीने कारवाई करावी, असे म्हटले होते.

योगेश कुलकर्णी यांनीसुद्धा याच आशयाची तक्रार केली होती. २१ जुलैला केलेल्या या तक्रारीवर कोणतीही कारवाई वा चौकशी केली नसल्याने हे ॲपसुद्धा फसवे असल्याचे सांगत कोलवणकर, कुलकर्णी व हास्य योग संघाच्या सर्व सदस्यांनी महापालिकेचा निषेध केला.

या वेळी सुधीर तळवळकर, सुरेश भालेराव, संजय तांबे, नारायण दाते, विदुला भांगे, श्रीकृष्ण कुलकर्णी, के. एस. अय्यर, सी. एन. कुबेर, दिनकर पेंडसे, अजित कुलकर्णी, दीपक भांबरे, शरद मराठे, निरंजन ढोबळे, डॉ. संदीप बुटाला, दिलीप उंबरकर उपस्थित होते.आज सकाळी अकराच्या सुमारास महापालिकेचे अधिकारी सुतारदरा येथील नाल्यात येणारे ड्रेनेजचे पाणी बंद करण्याऐवजी दुसरीकडेच जेसीबी लावून एका बिल्डरचे काम करत असल्याचे दिसल्याने नागरिकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात आला. शीवतीर्थनगर, अमेय सोसायटी, न्यू फ्रेंडस सर्कल, वास्तूश्री, अमेय सोसायटी, माधवबाग सोसायटी, सिल्व्हर क्रेस्ट, अनंतकृपा सोसायटीमधील नागरिकांनी कनिष्ठ अभियंता कुरे व पृथ्वीराज नाईक यांच्याकडे तक्रार केली.

कनिष्ठ अभियंता नाईक म्हणाले, ‘महापालिकेच्या मुख्य खात्याकडून या विषयावर कार्यवाही व्हावी, यासाठी आवश्‍यक माहिती मी वरिष्ठांना कळवतो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage Issue in Sutardara