ओला कचरा सोसायट्यांमध्येच जिरवणार : महापौर

ओला कचरा सोसायट्यांमध्येच जिरवणार : महापौर

पुणे : गृहरचना सोसायट्यांत निर्माण होणारा ओला कचरा सोसायट्यांतच जिरविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील 100 सोसायट्यांत याबाबतचे प्रकल्प कार्यान्वित करावे, यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा टिळक यांनी "सकाळ संवाद'च्या उपक्रमात शनिवारी केली. यासाठीचे तंत्रज्ञान आणि आवश्‍यक ते सर्व सहकार्य महापालिकेच्या माध्यमातून सोसायट्यांना देण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. 

"सकाळ संवाद' उपक्रमांतर्गत वाचकांशी संवाद साधताना त्यांनी ओला कचरा जिरविण्याबाबतच्या उपक्रमाची माहिती दिली. महापौर टिळक म्हणाल्या, ""कचऱ्याची समस्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. ओला कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेतच. परंतु, त्यात लोकसहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी आता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी लोकशिक्षण, जागरूकता निर्माण करण्यात येईल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.'' 
त्या म्हणाल्या, "" 75 किंवा 100 पेक्षा जास्त फ्लॅट असलेल्या सोसायट्या पहिल्या टप्प्यात निश्‍चित केल्या जातील. त्या सोसायट्यांत प्रकल्प सुरू करण्यासाठी तंत्रज्ञान महापालिका पुरवेल.

सोसायटीत तयार होणारा कचरा सोसायटीतच जिरविणे शक्‍य आहे. त्यासाठी गांडूळ खत प्रकल्प कार्यान्वित करता येऊ शकतो. त्याचा उपयोग सोसायटीचे उद्यान, परसबागेला होऊ शकतो. तसेच, कचरा विघटन प्रकल्पही राबविणे शक्‍य आहे. ओल्या कचऱ्याचे विघटन करण्यासाठीचे पर्याय संबंधित सोसायटीसमोर मांडण्यात येतील. त्यातील एक पर्याय त्यांनी निवडून अंमलबजावणी करणे शक्‍य आहे.'' 

सोसायटीतही कॉम्प्टॅक्‍टर 

कचरा गोळा करून नंतर तो कॉम्प्टॅक्‍टरपर्यंत सध्या पोचविला जातो. त्यामध्ये मनुष्यबळ जास्त लागते. त्यामुळे एखादा कॉम्प्टॅक्‍टर विशिष्ट वेळी सोसायटीत ठेवणे शक्‍य आहे. नागरिकांनी तेथे कचरा आणून दिल्यास तेथून तो थेट प्रक्रियेसाठी पाठविला जाऊ शकतो. पहिल्या टप्प्यात काही सोसायट्यांत हा प्रयोग राबविला जाईल. त्यानंतर शहरभर या "मॉडेल'ची अंमलबजावणी करण्याचा महापालिकेचा मानस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वेंगुर्ला पॅटर्न पुण्यातही शक्‍य 

कोकणातील वेंगुर्ला हे गाव पुण्यापेक्षा लहान आहे. परंतु, कचऱ्याचे विघटन करण्याबाबत ते आघाडीवर आहे. ते त्यांना जमते, तर पुणेकरांना का जमणार नाही? वेंगुर्ल्यात ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा, काचेचा कचरा, ई-कचरा आदी आठवड्यातील विशिष्ट दिवशी गोळा केला जातो, त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरणही होऊ लागले आहे. या धर्तीवर शहरातही उपक्रम राबविणे शक्‍य असून महापालिका त्यासाठी येत्या दहा दिवसांत उपाययोजना करणार आहे, असेही महापौरांनी सांगितले. 

- पुण्यात निर्माण होणारा रोजचा एकूण कचरा ः 1600 टन (ओला कचरा - सुमारे 600 टन, सुका कचरा - 1000 टन) 
- प्रक्रिया होणारा कचरा सुमारे 1000 टन ः 
- उर्वरित 600 टन कचरा उरुळी देवाची प्रकल्पात जातो 
- मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 5 ते 500 टनांचे 23 प्रकल्प (त्यापैकी 12 बंद) 
- गांडूळ खत प्रकल्प सुरू असलेल्या सोसायट्या - 364 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com