रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने स्थगित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

रस्त्याच्याकडेला खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना स्वच्छता राखण्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, काही व्यावसायिक त्यांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे परवाने स्थगित केले आहेत. त्यांना व्यावसाय करता येणार नाही. कचरा साठविण्याचे उपाय केल्यानंतरच परवाने पूर्ववत केले जातील.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका

पुणे - दुकानातील कचरा रस्त्यावर फेकू नका, असे वारंवार बजावूनही त्याकडे काणाडोळा केलेल्या सुमारे अडीचशे व्यावसायिकांचे परवाने महापालिकेने स्थागित केले. स्वच्छतेच्या उपाययोजना करेपर्यंत परवाने स्थगित ठेवण्यात येणार असून, त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे. स्वच्छ भारत अभियनाअंतर्गत ही कारवाई केली. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची महापालिका प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे. त्याअंतर्गत विशेष मोहीम राबवितानाच महापालिकेच्या मिळकतींसह खासगी आणि अन्य व्यावसायिक ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र हातगाडी, फेरीवाले आणि स्टॉलधारकांकडून रस्त्यावर कचरा आणि शिळे अन्न टाकले जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधी पसरल्याच्या तक्रारी आहेत. अशा व्यावसायिकांना कचरा साठविण्यासंदर्भात उपाय करण्याची सूचना घनकचरा व व्यवस्थापन विभागाने दिली होती; परंतु त्या न करता विशेषत: खाद्यपदार्थ व्यावसायिक आणि भाजीविक्रेते सर्रास रस्त्यांवर कचरा फेकत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांविरोधात कारवाई होती. अशाप्रकारे महिनाभरात २७४ जणांना परवाने स्थागित केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage Road Businessman License Cancel Municipal