उद्यानात करा अभ्यास अन्‌ फोटोग्राफीही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

काय करावे? 

  • विद्यार्थ्यांना उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागणार
  • उद्याने बंद असतानाही आतमध्ये प्रवेश मिळणार
  • सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत उद्यानाचा वापर करता येणार 
  • हौशी कलाकारांना चित्र, पक्षी व फुलांचे फोटो काढता येणार

पुणे - दुपारच्या वेळेत महापालिकेची उद्याने बंद असतात, तेव्हा या वेळेत तेथे विद्यार्थ्यांना विनामूल्य अभ्यास करता येईल व कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वावही देता येणार आहे. मात्र त्यासाठी उद्यान विभागाकडे अर्ज करून लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

पुणे शहरात महापालिकेची अनेक उद्याने आहेत. ‘थीम पार्क’मुळे नावीन्यपूर्ण उद्याने पुणेकरांना पाहायला मिळतात. ही उद्याने सकाळी ६ ते ११ तर संध्याकाळी चार ते रात्री आठपर्यंत खुली असतात. मात्र दुपारी उद्यानांमध्ये प्रवेश बंद असतो. उद्यान विभागाने कलाकार व विद्यार्थ्यांसाठी या नियमात शिथिलता आणली आहे. 

शहरात अभ्यासिका असल्या तरी त्याचे दर विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे त्यांना चांगल्या वातावरणात अभ्यास करण्याची परवानगी दिली आहे. सध्या महापालिकेच्या सात-आठ उद्यानांमध्ये ही सुविधा आहे, पण आता सर्वच उद्याने खुली असतील. तसेच चित्र काढणे, पक्षी, फुलांचे फोटो काढण्यासाठी हौशी कलाकारांना परवानगी दिली जाणार आहे.

प्री वेडिंग फोटोला बंदी 
लग्नाआधी किंवा इतर घरगुती कार्यक्रमापूर्वी फोटो शूट करण्याचे फॅड आहे. पालिकेच्या उद्यानात सुंदर फोटो निघू शकतात. पण अशा व्यावसायिक फोटोग्राफीमुळे या उपक्रमाच्या उद्देशाला हरताळ फासला जाऊ शकतो. त्यामुळे त्यास बंदी आहे. फक्त अभ्यास व कलाकारांनाच ही संधी मिळेल. यासाठी उद्यान विभागाकडे अर्ज करावा, त्यांना परवानगी दिल्याचे पत्र दिले जाईल. त्यांना उद्याने बंद असतानाही आतमध्ये प्रवेश मिळेल, असे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले. 

उद्यानांमध्ये अभ्यासासाठी परवानगी दिल्याने त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शांत व निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करता येईल. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल.
- अभिजित पाटील, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garden Study and Photography