सिलिंडरसाठी ताणाताण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सध्या कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असला, तर ‘बॅकलॉग’ मोठा असल्याने नागरिकांना सिलिंडरसाठी झगडावे  लागत आहे.

पुणे - सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्यामुळे एलपीजी गॅसचा विस्कळित झालेला पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम अन्य शहरांप्रमाणेच पुणेकरांनाही सहन करावा लागत आहे. सध्या कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असला, तर ‘बॅकलॉग’ मोठा असल्याने नागरिकांना सिलिंडरसाठी झगडावे  लागत आहे.

नोंदणीनंतर दहा ते पंधरा दिवस, तर काही ठिकाणी महिनाभर सिलिंडर मिळत नव्हता. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा पूर्ववत होऊ लागला आहे. परंतु, ‘बॅकलॉग’ची यादी मोठी असल्यामुळे वितरण व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही. शहरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडिया ऑईल या तिन्ही कंपन्यांचे ग्राहक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ग्राहक भारत गॅसचे आहेत. भारत पेट्रोलियम सोडले, तर अन्य दोन्ही कंपन्यांच्या सिलिंडरचा पुरवठा सुरळीत  सुरू आहे. 

गेल्या महिन्यापासून विस्कळित असलेला सिलिंडरचा पुरवठा हळूहळू पूर्ववत होऊ लागला आहे. परंतु, ‘बॅकलॉग’ मोठा असल्यामुळे अडचण येत आहे. नागरिकांनी विनाकारण सिलिंडरचे बुकिंग करू नये. 
- उषा पूनावाला,  अध्यक्ष, ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas cylinder shortage in pune