पहिले वेतन देऊन जपले सामाजिक उत्तरदायित्व

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

आर्थिक मदतीचे आवाहन
समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, खासगी कंपनी व आस्थापनांना सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून ‘माध्यमिक 
शालेय विद्यार्थी दत्तक योजना’ उपक्रमाला आर्थिक मदत करून यात सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने केले आहे. दहा हजार रुपयांची देणगी देऊन एका विद्यार्थ्याचे वार्षिक शैक्षणिक पालकत्व घेता येईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या देणगीदारांना ‘कलम ८० जी’नुसार प्राप्तिकरात ५० टक्के सवलत मिळेल. मदतीचे धनादेश ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ या नावाने ‘सकाळ’च्या शिवाजीनगर येथील कार्यालयात रोज सकाळी १०.३० ते ५ या वेळेत (रविवारी व सुटीचे दिवस वगळून) स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठीसंपर्क - ८६०५०१७३६६

पुणे - हडपसर परिसरातील मगरपट्टा येथील गौरी रवींद्र शिंदे (वय ३०) यांना राज्य सरकारच्या लेखापरीक्षा विभागात नोकरी मिळाल्यानंतर सामाजिक जाणिवेतून त्यांनी पहिले वेतन वीस हजार रुपये ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमिक विद्यार्थी दत्तक योजनेस देणगी म्हणून दिले.

गौरी यांच्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांना वडिलांच्या जागी दोन महिन्यांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. सामाजिक बांधिलकीतून गौरी यांनी ही देणगी दिली आहे. याविषयी गौरी म्हणाल्या, ‘‘मला डॉक्‍टर व्हायचे होते. परंतु, आर्थिक स्थितीमुळे डॉक्‍टर होता आले नाही. माझ्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. माझी नोकरी हे माझ्या वडिलांचे काम असल्याने माझे पहिले वेतन दान करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वडिलांना समाजासाठी काही तरी करायचे होते. मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले नाही. पण, कोणी माझ्या देणगीमुळे शिक्षण घेऊ शकले, तर मला खूप समाधान मिळेल.’’

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विशेष करून ग्रामीण भागातील अल्पोत्पन्न गटातील पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, एकूण निधी चार लाख एक्काहत्तर हजार एक रुपयांपर्यंत पोचला आहे. यामध्ये नितीन हांडे (पुणे), रामदास पुराणिक (माणगाव, रायगड), इतिहास संशोधक सुरेश जोशी (नगर) यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Shinde First Salary Donate Sakal India Foundation Motivation