इवल्या-इवल्या "वानरसेने'ची आभाळाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

साडेबाराशे बालकांनी सादर केलं "गीतरामायण'; ठरले विश्‍वविक्रमवीर

साडेबाराशे बालकांनी सादर केलं "गीतरामायण'; ठरले विश्‍वविक्रमवीर
पुणे - दोन दिवसांपूर्वीपर्यंत ज्या स्थळी उभ्या भारताचा श्रद्धेय संगीतोत्सवातल्या "सवाई'स्वरांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला होता, त्याच स्थळी मंगळवारी पुनःश्‍च एकदा दुमदुमणारं स्वरवातावरण अनुभवता आलं. अर्थात, या दिवसाचा उत्साह आणि त्यात असणारा लोकसहभाग हा जणू आज चरमोत्कर्षालाच पोचला होता. त्याला कारणही होतंच तसं- अजून आपल्या आयुष्याची बाळपावलंच टाकणाऱ्या साडेबाराशे इवल्या-इवल्या बालकांनी "न भूतो न भविष्यती' असा आविष्कार घडवत गदिमा आणि बाबुजींनी अजरामर केलेलं "गीतरामायण' सादर करत विश्‍वविक्रमाला गवसणी घातली होती !

गीतरामायणाचं हे बालरूप पाहायला रमणबागेच्या मैदानात हजारो रसिकांनी गर्दी केली होती. गदिमांच्या एकोणचाळीसाव्या पुण्यतिथीची पूर्वसंध्या आणि गीतरामायणाची एकसष्टी असा दुहेरी योग साधत हा प्रयोग साकारण्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने हा महत्त्वाकांक्षी प्रयोग घडवला आणि त्याचा विश्‍वविक्रम घडविण्यातही त्यांची "वानरसेना' यशस्वी ठरली.

एरवी गीतरामायणाचं शिवधनुष्य पेलणं सोपं ते कुणाला आहे ? पण अवघ्या सहा ते अकरा वयाच्या या साडेबाराशे बालकांनी एकत्र येत सादरीकरणातून आपापसांतील समन्वयाचं आणि एकतानतेचं आगळंच दर्शन उपस्थितांना घडवलं. "जोवरि जग हे; जोवरि भाषण, तोवरि नूतन नित रामायण' या उक्तीप्रमाणेच ही नवी पिढीही जणू या आधुनिक महाकाव्याशी सहज जोडली गेल्याचं दिसत होतं. मूळ गीत रामायणातली निवडक 21 गीतं घेऊन हे सादरीकरण करण्यात आलं. "वंडरबुक ऑफ रेकॉर्ड' आणि "वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' यांनी याची एक विक्रम म्हणून दखलही घेतली.

"स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती' या ओळींपासून सुरू झालेली ही संगीतसफर "राम जन्मला गं सखी राम जन्मला'... "स्वयंवर झाले सीतेचे'सारख्या अनेक गीतांपर्यंत सुरूच होती. त्यानंतर राम-सीता-लक्ष्मण अशी मिरवणूक जेव्हा काढली, तेव्हा रसिकांमधल्या "भाविकांनी' उत्स्फूर्तपणे जय श्रीराम म्हणत हात जोडल्याचंही पाहायला मिळालं.

ऍनिमेशनने केली कमाल !
भव्य मंचाच्या पार्श्‍वभूमीवर लावलेल्या स्क्रीनवर ऍनिमेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षाहूनही उत्कट म्हणावी अशी साक्षात अयोध्या नगरी उभी केल्याचं दिसत होतं. ही कमाल अपुरी की काय, पण समुद्र, लंकादहन, मोठमोठी वनं अशी सारी दृष्य अगदी खरी वाटावीत अशी उभी केली होती. शिवाय, आधुनिक तंत्र वापरून द्रोणागिरी पर्वत उचलून आणणारा हनुमान हवेतून उडतानाही दाखवला होता.

Web Title: geetramayan world record