जेनेरिक औषधांची शहरात 5 दुकाने

आशा साळवी
बुधवार, 25 एप्रिल 2018

पिंपरी - मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब या विकाराने अनेक जण त्रस्त आहेत. त्यावरील ‘ब्रॅंडेड’ कंपन्यांची औषधे महाग आहेत. त्या तुलनेत जेनेरिक (जनौषधी) औषधे ३० ते ७० टक्के स्वस्त आहेत. मात्र, अशा मेडिकल स्टोअर्सची संख्या शहरात कमी होती. आता नव्याने अशी पाच मेडिकल स्टोअर्स शहरात सुरू झाली आहेत. त्यांचा सामान्य रुग्णांना लाभ होत आहे. आणखी दहा मेडिकल स्टोअर्स लवकरच सुरू होणार आहेत.  

पिंपरी - मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब या विकाराने अनेक जण त्रस्त आहेत. त्यावरील ‘ब्रॅंडेड’ कंपन्यांची औषधे महाग आहेत. त्या तुलनेत जेनेरिक (जनौषधी) औषधे ३० ते ७० टक्के स्वस्त आहेत. मात्र, अशा मेडिकल स्टोअर्सची संख्या शहरात कमी होती. आता नव्याने अशी पाच मेडिकल स्टोअर्स शहरात सुरू झाली आहेत. त्यांचा सामान्य रुग्णांना लाभ होत आहे. आणखी दहा मेडिकल स्टोअर्स लवकरच सुरू होणार आहेत.  
औषध कंपन्यांची जाहिरातबाजी, कर, व्यापारी आणि केमिस्ट यांचे कमिशन, वाहतूक खर्च आदींमुळे ‘ब्रॅंडेड’ औषधी जेनेरिक औषधांपेक्षा अनेक पटीने महाग असतात. हा बोजा रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांवरच पडतो. या दुष्टचक्रातून जेनेरिक औषधे सुटका करू शकतात. काही अत्यावश्‍यक औषधे किंवा इंजेक्‍शन स्वस्त व गुणवत्तापूर्ण आहेत, असे जनरिका मेडिसीन कंपनीच्या पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख वर्षा भालेराव यांनी सांगितले. जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रॅंडेड औषधांच्या तुलनेने नगन्य असल्याची सामान्यांची भावना आहे. प्रत्यक्षात जेनेरिक औषधी गुणवत्तापूर्ण व प्रभावी असल्याचेही भालेराव यांनी सांगितले. 

काय आहे जेनेरिक औषध
जेनेरिक म्हणजे मूळ औषध. जेनेरिक व ब्रॅंडेड औषधांचे गुणधर्म एकच असतात. विविध कंपन्या स्वत:चे ‘ब्रॅंडनेम’ देऊन ती औषधे बाजारात आणतात. सर्वच रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. या औषधांची कोठेही जाहिरात केली जात नाही. सामान्यांना त्या औषधांची नावे माहिती नाहीत, असे त्या म्हणाल्या.

इथे आहेत जेनेरिक स्टोअर्स
शहरात सध्या एचए कंपनी, प्रेमपार्क- मासूळकर कॉलनी, चिंचवड, जयगणेश साम्राज्य- मोशी व संभाजीनगर अशा पाच ठिकाणी जेनेरिक मेडिकल स्टोअर्स आहेत. त्यांच्याकडे जेनेरिक औषध स्वस्तात उपलब्ध आहेत. तसेच, शहरात येत्या जूनपर्यंत पिपळे गुरव, सांगवी, पिंपळे निलख, निगडी, आकुर्डी, दापोडी, कासारवाडी, काळेवाडी आदी परिसरात सुमारे दहा जेनेरिक मेडिकल स्टोअर्स सुरू होण्याची शक्‍यता आहे.

असे मिळवा औषध
अनेकदा डॉक्‍टरांकडून जेनेरिक औषध लिहून दिले जात नाही. त्यामुळे आर्थिक फटका बसतो. डॉक्‍टरांकडून जेनेरिक औषध लिहून देण्याचा आग्रह करा. रुग्णांनी मागणी केल्यावर सर्व प्रकारची औषधे उपलब्ध होऊ शकतात. मात्र, जेनेरिक औषध देण्यास डॉक्‍टरांनी नकार दिल्यास १८००११११५४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

मधुमेह, हृदयरोग असे विकार श्रीमंतापासून ते सर्वसामान्यांमध्ये उद्‌भवत आहेत. त्यावरील औषधे महागडी आहेत. मात्र, त्यावर जेनेरिक औषधी स्वस्तात उपलब्ध झाली आहेत. ती वापरली पाहिजेत.
- डॉ. राम गुडगिला, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ

जेनेरिक व ब्रॅंडेड औषधांचे गुणधर्म एकच आहेत. जेनेरिक औषधी ब्रॅंडेड औषधांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण व प्रभावी असतात. जनऔषधीमुळे आजारांवर स्वस्तात उपचार उपलब्ध झाले आहेत.
- डॉ. श्‍याम अहिरराव, विश्‍वस्त, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज

Web Title: generic medicine 5 shop s in city