पुण्यातून उद्योग हलविणार नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

जर्मन कंपन्या पुण्यातून उद्योग हलविणार नसून, उलट गुंतवणूक वाढविण्याचा विचार करीत असल्याचे ट्‌विट जर्मनीचे वाणिज्यदूत जोर्गन मोरहार्ट यांनी केले आहे.

पुणे - जर्मन कंपन्या पुण्यातून उद्योग हलविणार नसून, उलट गुंतवणूक वाढविण्याचा विचार करीत असल्याचे ट्‌विट जर्मनीचे वाणिज्यदूत जोर्गन मोरहार्ट यांनी केले आहे.

येथील इंडो-जर्मन उद्योगपतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी जर्मन वाणिज्यदूत मोरहार्ट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनासोबत जर्मन उद्योगाविषयी विविध बाबींवर चर्चा केली. जर्मन उद्योगांना कामगार संघटनांचा त्रास असून, उद्योग व्यवस्थापन तणावाखाली आहे. त्रास देणाऱ्यांचा प्रशासनाने बंदोबस्त केला नाही, तर जर्मन उद्योग शांघायला नेऊ, असे मोरहार्ट म्हणाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

याबाबत मोरहार्ट यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर राष्ट्रीय हमाल पंचायतीचे समिती सदस्य चंदन कुमार यांनी चर्चा केली. त्या वेळी एका प्रश्नाला उत्तर देताना मोरहार्ट यांनी उद्योग परदेशात हलविण्यात येणार नाहीत. तर, पुण्यासह महाराष्ट्रात जर्मन उद्योगांची आणखी वाढ करणार असल्याचे स्पष्ट केले.

कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने नुकतीच विशेष बैठक घेतली. सद्यःस्थितीत कामगार विरोधी धोरणामुळे कामगारांचे शोषण वाढले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला भेटून व्यवस्थापन, प्रशासन आणि कामगार संघटनांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. तसेच, हमाल पंचायतीने 25 जुलैला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर मोरहार्ट यांनी स्पष्टीकरण केले आहे. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे, असे राष्ट्रीय हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष नितीन पवार यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: German Company Pune Business Investment grogan morheart