उष्माघाताने अर्धमेला झालेल्या माकडाला प्राणीमित्राकडून जीवदान

मिलिंद संधान
सोमवार, 14 मे 2018

नवी सांगवी (पुणे) : उष्माघाताने अशक्त झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्र विनायक बडदे यांनी जीवदान दिल्याची घटना आज घडली. मागील आठ दिवसांपासून ऊन्हाचा पारा उच्चांक गाठत असताना मनुष्याबरोबर प्राण्यांनाही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे आजच्या या ताज्या घडनेवरून पुढे आले आहे. 

नवी सांगवी (पुणे) : उष्माघाताने अशक्त झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्र विनायक बडदे यांनी जीवदान दिल्याची घटना आज घडली. मागील आठ दिवसांपासून ऊन्हाचा पारा उच्चांक गाठत असताना मनुष्याबरोबर प्राण्यांनाही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे आजच्या या ताज्या घडनेवरून पुढे आले आहे. 

पिंपळे निलख विशालनगरातील चोंधे पाटील लॉन्स जवळील एका झाडावर दोन तीन दिवसांपासून एक माकड निपचीत पडल्याचे दिसून येत होते. काल रविवार रोजी दुपारी दोनच्या दरम्यान ते माकड झाडावरून खाली पडले. तेंव्हा तेथील एका व्यक्तीने भांबुर्डा येथील वनरक्षक विजय शिंदे यांना फोनवरून ही माहिती दिली. शिंदे यांनी लागलीच सांगवी येथील प्राणी मित्र विनायक बडदे यांना सदर परिस्थितीची माहिती देऊन त्या माकडापर्यंत पोहचण्यास सांगितले. बडदे हे ही तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि माकडाला ताब्यात घेतले असता त्याच्या शरीरावर कोणतीही जखम अथवा इजा त्यांना दिसली नाही. परंतु ते त्याच्यात अत्यंत अशक्त दिसून येत होता. 

निपचीत पडलेल्या माकडाला बडदे यांनी औंध येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असता काल रविवार असल्याने तो दवाखाना बंद होता. तेंव्हा पशुवैद्य डॉ शंकर शेटे यांच्याशी संपर्क साधला असता ते ही तेथे तात्काळ हजर झाले व माकडाची चिकित्सा करून त्याच्यावर औषधोपचार केला. त्यानंतर बडदे यांनी माकडाला त्यांच्या घरी आणले. त्याला ते इलेक्ट्रॉल पावडर बरोबर ज्यूस व फळे खाऊ घालत असून त्याची तब्येत सुधारत आहे. आणखी पाच सहा दिवसांनी पुर्ण बरे झाल्यावर बडदे वनविभागाच्या देखरेखीखाली त्याला जंगलात सोडून देणार आहेत. 

पशुवैद्य डॉ शेटे म्हणाले, "वाट चुकलेले, उपाशी, तहाणलेले व घाबरलेल्या या माकडाला ऊन्हाचा त्रास झाल्याने बराचसा अशक्तपणा आला होता. त्याला इलेक्ट्रॉल पावडर दिल्यावर थोडा तरतरीतपणा येऊन ते शुध्दीवर आले. त्याला आणखी काही दिवस आराम आणि औषधोपचाराची गरज आहे."

झोपडी वजा पत्र्याच्या खोलीत राहणारे विनायक बडदे हे वन्यपशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था चालवित आहे. शासन अथवा इतरांकडून कोणतेही अनुदान, फी, अथवा देणगी न घेता प्राणीमात्रांची सेवा करीत आहेत. कुत्री, मांजर, मोर लांडोर, घुबड, घार, उदमांजर, वटवाघुळ यासारख्या शेकडो जखमी प्राण्यांना त्यांनी स्वतःचे रूपये खर्च करून जीवदान दिले आहे. 

Web Title: get a life to monkey who suffers from heat stroke by pranimitra