‘घाशीराम कोतवाल’ बंगाली भाषेत रंगमंचावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

भवानीनगर - सणसरचे सुपुत्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ऐतिहासिक घाशीराम कोतवाल नाटकाला राष्ट्रीय स्तरावर पोचविण्याचा विडा उचलला आहे. सोमवारी (ता. ६ ) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी साडेपाचला हे नाटक बंगाली भाषेत सादर होणार आहे. तत्पूर्वी दुपारी बाराला मराठी प्रयोग होणार आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा प्रयोग होणार आहे. मेघराज राजेभोसले व वैभव जोशी यांच्या नलिमोत्तम-पांडव या संस्थेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून घाशीराम कोतवाल रंगमंचावर साकारले. याच नाटकाने बंगाली भाषेलाही भुरळ घातल्याने राजेभोसले यांच्या हाताला चांगलेच यश आले आहे. 

सणसर (ता. इंदापूर) येथे याची माहिती मिळताच सणसर विकास मंचाच्या वतीने मेघराज राजेभोसले यांचे अभिनंदन करण्यात आले. राजेभोसले यांनी संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीच मराठी लावण्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या साथीने देशभरातील विविध राज्यांमध्ये पोचविल्या आहेत. आता बंगाली भाषेत मराठी इतिहास पोचविण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

बंगालमधील चेतना ग्रुपमधील ५० बंगाली कलाकार हे नाटक पुण्यात सोमवारी सादर करणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रंगीत तालमी सुरू असून, मेघराज राजेभोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. दरम्यान, यासंदर्भात मेघराज राजेभोसले म्हणाले, ‘‘घाशीराम कोतवाल या नाटकाचे जगभरात अनेक प्रयोग झाले आहेत; मात्र मराठी भाषा सोडून त्याचा बंगालीत होत असलेला प्रयोग खरोखरच उत्सुकतेचा आहे. सर्वांनी त्यासाठी मेहनत घेतली आहे. हा नाटकाचा प्रयोग मराठी रंगभूमीची उंची वाढविणारा ठरेल, यात शंकाच नाही.’’

Web Title: ghashiram kotwal in bangal language