घोडमधील उपयुक्त साठा संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

न्हावरे - शिरूर तालुक्‍यातील चिंचणी येथील घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा आज संपुष्टात आला. त्यामुळे घोड जलाशयावर अवलंबून असणाऱ्या लाभक्षेत्रातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना व उपसा सिंचन योजनांना पाणी कमी पडून त्याची झळ बसू लागली आहे. खबरदारी म्हणून रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगीक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात आतापासूनच कपात करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

घोड धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सात हजार ६३९ दशलक्ष घनफूट एवढी आहे. यामध्ये २१७८ दशलक्ष घनफूट मृत साठ्याचे प्रमाण आहे. धरणाच्या पाण्यावर श्रीगोंदा, शिरूर व कर्जत तालुक्‍यांतील सुमारे वीस हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली येते. त्याचबरोबर रांजणगाव गणपती औद्योगीक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर शिरूर तालुक्‍यातील न्हावरे, कारेगाव, ढोकसांगवी, तर्डोबाचीवाडी, गोलेगाव, निमोणे, शिंदोडी आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील हिंगणी, म्हसे, वडगाव शिंदोडी, काष्टी, श्रीगोंदा (शहर) आदी गावांतील ग्रामस्थांना या धरणाच्या जलाशयातून नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवले जाते. चालू वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला होता. 

जलाशयात समाधानकारक पाणी होते, मात्र संबंधित घोड विभागाने आवर्तनाचे योग्य नियोजन केल्यामुळे शेवटी लाभधारक शेतकऱ्यांना पाणी कमी पडून त्याची पिकांना झळ बसली आहे. त्याचबरोबर जनावरांनाही पाण्याची पिण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची वेळ आली आहे. 

Web Title: ghod dam water storage