घोरपडी उड्डाण पुलासाठी प्रतीक्षाच ! 

संतोष शाळिग्राम
रविवार, 8 एप्रिल 2018

नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही उड्डाण पूल उभारणीला जागा दिली आहे. आता तेथील लोकांना हलवून त्यांचे पुनर्वसन करणे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत उड्डाण पूल बांधला जाऊ शकणार नाही. 
- यज्ञेश्‍वर शर्मा, महासंचालक, स्थावर विभाग, संरक्षण दल 

पुणे : घोरपडी गावाकडे जाताना आणि येताना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करणाऱ्या नागरिकांना उड्डाण पुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पुलासाठी आवश्‍यक जागा कुणी मिळवून द्यायची म्हणजे भूसंपादन कुणी करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिका आणि पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने हात वर केले आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाण पुलाची मागणी होत आहे. अखेर संरक्षण खात्याने त्यासाठी जागा देण्यास मान्यता दिली. पण अद्यापही पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. या कामामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन आणि भूसंपादनाचे काम होत नसल्याने उड्डाण पुलाचे कामही रखडले आहे. त्यामुळे घोरपडी गावात जाताना आणि बाहेर पडताना नागरिकांना वेळेबरोबरच वाहतूक कोंडीचा त्रासही सहन करावा लागत आहे. 

आमची हद्द नाही 

महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला म्हणाले, ""महिन्यापूर्वी महापालिका, कॅंटोन्मेंट आणि लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात पुनर्वसन आणि भूसंपादनाचा विषय चर्चिला गेला. त्या वेळी ही कामे महापालिकेने करावीत, असे मत मांडण्यात आले होते. परंतु घोरपडी ही महापालिका हद्दीत नाही. ती कॅंटोन्मेंट हद्दीत असल्याने हे काम करण्यामध्ये अडचणी आहेत.'' 

काम पालिकेचेच 

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने मात्र भूसंपादनाचे काम महापालिकेचेच असल्याचे स्पष्ट केले. बोर्डाचे उपकार्यकारी अभियंता एम. बी. साबळे म्हणाले, ""भूसंपादन कुणी करायचे हा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कारण या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता देताना पुलाचे बांधकाम आणि भूसंपादन हे महापालिकेने करायचे असे स्पष्ट केलेले आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाची काही जागा जाते आहे. ती आम्ही देणार आहोत.'' 

प्रकल्पाचा एकूण खर्च : 135 कोटी 
बांधकामाचा खर्च : 70 कोटी 
पुनर्वसनाचा खर्च : 65 कोटी 
बाधित होणारी मालमत्ता : 170 

Web Title: Ghorpadi Flyover still wait