Kasba Bypoll: गिरीश बापट करायचे ते भाजपच्या फौजेला जमलं नाही? त्यामुळे मिळाली धंगेकरांना कसब्याची साथ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll

Kasba Bypoll: गिरीश बापट करायचे ते भाजपच्या फौजेला जमलं नाही? त्यामुळे मिळाली धंगेकरांना कसब्याची साथ!

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये कसब्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या ३० वर्षापासून बालेकिल्ला असणाऱ्या भाजपला निवडणूक अवघड का गेली याचे कारण शोधण्यासाठी भाजपला नक्की विचार करावा लागणार आहे.

भाजपचे अनेक बडे नेते हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पूर्णवेळ कसब्यात तळ ठोकून होते. गेल्या ३० वर्षापासून भाजपचा हा बालेकिल्ला आहे. मात्र पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट हे कसब्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे भाजपला कधीही इतकी ताकद कसब्यामध्ये लावावी लागली नसल्याचं चित्र होतं. मात्र या पोटनिवडणुकीमध्ये प्रकृती अस्वस्थ्यामुळे गिरीश बापट सहभागी होऊ शकले नाहीत आणि याचाच फटका आता भाजपला बसल्याच्या चर्चा सुरू आहेत.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रामुख्याने दोन भाग दिसून येतात. बाजीराव रस्त्याच्या पूर्वेला आणि बाजीराव रस्त्याच्या पश्चिमेला मतदारांची विचारसरणी आणि सांस्कृतिक बदल प्रामुख्याने दिसून येतो. पश्चिमेचा मतदार हा भाजपचा पारंपारिक मतदार मानला जातो तर पूर्वेचा मतदार हा काँग्रेसचा मतदार मानला जातो.

मात्र गिरीश बापट यांचा संपर्क हा या मतदारसंघाच्या दोन्ही बाजूला तितकाच तगडा होता. गिरीश बापट सक्रिय नसल्यामुळे या पोटनिवडणुकीत पूर्वेचा मतदार हा भाजपची साथ पूर्णपणे सोडल्याचं दिसून आलं आहे. तर पश्चिम भागातील मतदार देखील व्यक्ती पाहून मतदान करू असं बोलताना दिसत होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपला गिरीश बापट यांची उणीव नक्कीच जाणवली आहे.

मतमोजणीच्या वेळी काही फेऱ्यात हेमंत रासने यांच्या मतांचा आकडा वाढत होता. काही वेळ रवींद्र धंगेकर यांचं मताधिक्य घटताना दिसून आलं होतं. परंतु रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

टॅग्स :Girish Bapatpuneelection