धनिकांनी समाजहितासाठी योगदान द्यावे : बापट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

येरवडा : ''मुकुल माधव फाउंडेशनने सीएसआरअंतर्गत निधी उपलब्ध करून राजीव गांधी रुग्णालयात नवजात अर्भकांसाठी अतिदक्षता विभाग उभारून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. इतर धनिकांनी यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी योगदान द्यावे,'' असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

फिनोलेक्‍स इंडस्ट्रीजच्या सीएसआरमधील भागीदार मुकुल माधव फाउंडेशनने उभारलेल्या नवजात अर्भक अतिदक्षता विभागाचे उद्‌घाटन करताना बापट बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार जगदीश मुळीक, माजी आयुक्त कुणाल कुमार, मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, डॉ. अंजली साबणे, डॉ. स्वाती पाटील, नगरसेविका अर्चना पाटील, नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते. 

मुकुल माधव फाउंडेशनने गांधी रुग्णालय आणि भवानी पेठेतील चंदूमामा सोनावणे प्रसूतिगृह येथे अर्भकांसाठी उभारलेल्या या अतिदक्षता विभागामुळे अल्प दरात उपचार शक्‍य होणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. 

गांधी रुग्णालयात बारा खाटांचा नवजात बालक अतिदक्षता विभाग आहे. या ठिकाणी मध्यम आजारावर उपचार केले जाणार आहेत; तर गंभीर आजारी नवजात बालकांवर ससूनमध्ये उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे गांधी रुग्णालयासाठी ससूनच्या धर्तीवर निवासी डॉक्‍टर असणे आवश्‍यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केले आहे.

Web Title: Girish Bapat inaugurated NICU in Rajiv Gandhi Hospital