कंपनी कामगार, ‘भाऊ’ अन्‌ आता खासदार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली गिरीश बापट यांची कारकीर्द नगरसेवक, आमदार, पालकमंत्री व्हाया खासदार अशी झाली आहे. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला अन्‌ त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली.

पुणे - टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू झालेली गिरीश बापट यांची कारकीर्द नगरसेवक, आमदार, पालकमंत्री व्हाया खासदार अशी झाली आहे. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार झालेल्या बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला अन्‌ त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली. पक्षांतर्गत आव्हानांचे अडथळे युक्तीने पार करीत गेल्या निवडणुकीत हुकलेली खासदारकी भाऊंनी या वेळी जिद्दीच्या बळावर मिळविली अन्‌ पक्षाचे पुण्यातील नेतृत्त्वही सिद्ध केले.

भाजपमधील गटातटात योग्य ‘रस्ता’ पकडल्यामुळे पालकमंत्रिपदावरून बापटांचा खासदारपदापर्यंतचा ‘प्रवास’ सुलभ झाला. कोकणस्थ असले तरी, बापटांचा गोतावळा हा बहुजन चेहऱ्यांचा राहिला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट १९७३ मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.

तेथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. त्यानंतर १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते नगरसेवक झाले अन्‌ पुढे तीन वेळा त्या पदावर यशस्वी झाले. महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविण्याची कमाल त्यांनी १९८६-८७ मध्ये केली. १९९५ मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 

सुरेश कलमाडी असो अथवा अजित पवार कोणत्याही विरोधी राजकीय नेत्यांशी संवाद साधून मतदारसंघाची कामे करून घ्यायचे कसब बापटांना सर्वसमावेशक करून गेले. 

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा कसबा बदलत गेला तसे बापट यांनी विविध समाजातील युवा कार्यकर्त्यांना पाठबळ दिले, त्यांना नगरसेवक पदावर निवडून आणले आणि आपली तटबंदी भक्कम केली. प्रत्येक वेळी नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा त्यांचा कल असल्यामुळे काही जण नाराज झाले तरी ते तुटणार नाही, याचीही काळजी ‘हेडमास्तरां’प्रमाणे बापटांनी घेतली. कार्यकर्त्यांमध्ये रमतानाच कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची हातोटी असल्यामुळे कोठे काय घडत आहे, याची बित्तंबातमी त्यांच्यापर्यंत पोचते. काहीवेळा उत्साहाच्या भरात त्यांनी केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली तरी विचलित न होता, ते ठाम राहिले. गेल्या लोकसभेला उमेदवारीने हुलकावणी दिली तेव्हापासूनच यंदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी तयारी केली अन्‌ ती मिळविलीच नव्हे तर, खासदारकीही गाठली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Bapat Political Journey Company Employee Win MP Politics