पुण्याचा चेहरा बदलणार - बापट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

बारामती, शिरूरमध्ये प्रयत्नांत कमी पडलो 
बारामती, शिरूर मतदारसंघांत आमचे प्रयत्न थोडे कमी पडल्याने पराभव झाला. बारामतीत संस्थांमधून त्यांच्या मतांचे जाळे आहे. त्यांचा तो परंपरागत किल्ला आहे. येथे थोडी ताकद कमी पडली. पुरंदरमध्ये शिवतारेंनी काम केले, पण त्यांच्यापेक्षा जास्त काम विरोधकांनी केल्याने तेथे मते जास्त मिळाली असली तरी विधानसभा आम्ही जिंकू. तर मावळमधील मतदारांनी घराणेशाही चालू दिली नाही. कोणाचा नातू, कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून लादलेल्या उमेदवाराला मतदार निवडून देत नाहीत, अशी टीका बापट यांनी केली.

पुणे - भाजपने गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चालना दिली. मेट्रो, पीएमआरडीए, पाणीपुरवठा यांसह अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधिल आहे. शहराचा चेरहामोहरा बदलून टाकणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर बापट यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते. ते म्हणाले, ‘‘मला  ६ लाख ४४ हजार मते पडतील, असा माझा अंदाज होता; पण त्यापेक्षा सुमारे ११ हजार ६०० मते कमी पडली आहेत. या निवडणुकीमध्ये मी विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही, असे स्पष्ट केले होते; पण विरोधकांनी माझ्यावर आरोप केले. तरीही पुणेकारांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून सव्वातीन लाखांचे मताधिक्‍य दिले. त्यास तडा जाऊ देणार नाही. शहराच्या विकासाचा कार्यक्रम ठरवून जाहीरनाम्याची अंमलबजावणी करू. सामान्य माणसाचे प्रश्‍न सोडविण्याचे वचन दिले आहे. ते पूर्ण करणार.’’

या वेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, जगदीश मुळीक, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपर-चिंचवडचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक कांबळे आदी उपस्थित होते.  

माझ्यापेक्षा चांगला पालकमंत्री असेल
‘मी माझ्या आमदारपदासह मंत्रिपदाचाही राजीनामा देणार आहे. पुण्याचा पालकमंत्री कोण असेल, पुण्यातील असेल की बाहेरचा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल. माझ्यापेक्षा चांगले काम करणारा पालकमंत्री पुण्याला मिळेल. 

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार कोण असणार, यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ. तसेच शिवसेनेवर अन्याय होऊ देणार नाही,’’ असे बापट यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Bapat Pune Development Changes