पुणेकरांना लेकी नकोशा!

पुणेकरांना लेकी नकोशा!

मुलांच्या तुलनेत प्रमाण कमी; गर्भपातावरील कारवाई थंडावल्याचा परिणाम
पुणे - गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्‍टरांच्या मुसक्‍या आवळण्यात महापालिका प्रशासन गेल्या चार वर्षांपासून सतत अपयशी ठरल्याने शहरात जन्माला येणाऱ्या मुलींचे प्रमाण वेगाने ढासळत आहे. डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने 2012 मध्ये दर हजार मुलांमागे जन्माला येणाऱ्या मुलींचे प्रमाण 934 होते. गेल्या पंधरा वर्षांतील हा सर्वाधिक जन्मदर होता. मात्र, आता हे प्रमाण 924 पर्यंत ढासळले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

कारवाई थंडावली
दर हजार मुलांमागे जन्मणाऱ्या मुलींची संख्या वेगाने कमी होत असल्याचा खळबळजनक निष्कर्ष 2011च्या जनगणनेतून पुढे आला. त्यानंतर "गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र‘ कायद्याची (पीसीपीएनडीटी) काटेकोर अंमलबजावणी शहरात सुरू झाली. गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्‍टरांवर झपाट्याने कारवाया झाल्या.

अशा डॉक्‍टरांवर कारवाईची धार गेल्या चार वर्षांपासून कमी झाल्याने जन्मणाऱ्या मुलींचे प्रमाण वेगाने ढासळत आहे.

डॉक्‍टरांच्या दबावाचा परिणाम?
2011 मध्ये महापालिकेने सर्वाधिक (16) कारवाया केल्यामुळे 2012 मधील मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे 934 होते; तर, 2015 मध्ये फक्त आठ डॉक्‍टरांवर कारवाई झाल्यामुळे यंदाच्या वर्षी मुलींचे प्रमाण 924 म्हणजेच दहाने कमी झाले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील रेडिओलॉजिस्ट आणि डॉक्‍टरांवर अन्यायकारक कारवाई केल्याचे चित्र उभे केले जात आहे. त्यासाठी कारवाईची तीव्रता कमी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. डॉक्‍टरांच्या या दबावामुळे कारवायांची संख्या कमी झाली. त्याचा थेट परिणाम दर हजार मुलांमागे जन्माला येणाऱ्या मुलींची संख्या कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते.

तपासणी यंत्रणा सुधारण्याची गरज
गर्भलिंग निदान करणाऱ्या आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्‍टरांवर आवश्‍यक कारवाई करावी. त्यांना कठोर शिक्षाही करावी; पण केवळ तांत्रिक आणि कागदोपत्री चुकांच्या आधारावर डॉक्‍टरांवर खटले दाखल करू नयेत, असे मत डॉक्‍टरांनी नोंदविले.

सोगोग्राफी केंद्र आणि गर्भपात यांची तपासणी यंत्रणा सुधाण्याची गरज असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबाबत महापालिकेला लवकरच पत्र पाठविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

वर्ष ....... जन्मलेली मुले ..... जन्मलेल्या मुली .... लिंग गुणोत्तर .. महापालिकेची कारवाई
2015 ........... 28,015 .............. 25,902 ................ 924 ................. 1
2014 ........... 27,843 .............. 26,095 ................ 931 ................. 1
2013 ........... 28,772 .............. 26831 ................. 933 ................. 0

धक्कादायक प्रमाण
देशात दर हजार मुलांमागे गेल्या वर्षी मुलींचे प्रमाण 944 असताना पुरोगामी महाराष्ट्रातील प्रागतिक पुण्यात मुलींचे प्रमाण मात्र, त्यापेक्षाही खाली घसरले आहे. "बेटी बचाओ‘सारख्या अनेक मोहिमा राबविण्यात येऊनही पुण्यात मुलींचे घटत असलेले प्रमाण धक्कादायक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com