सराईत गुन्हेगाराकडुन पुण्यातील सुतारदरा परीसरात तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

पुणे पोलिसांनी नितीन सणस यास नोव्हेंबर २०१८ मध्ये शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. त्याच्यावर यापूर्वी खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी,खंडणी मागणे, पिस्तूल जवळ बाळगणे असे विविध प्रकारचे तब्बल १२ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातुन सराईत गुन्हेंगारासह तिघांनी मंगळवारी रात्री एका तरूणाच्या घरासमोरील वाहनांसह रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केली. याचबरोबरच सराईत गुन्हेंगाराने तरूणीचे कपडे फाडीत तिचा विनयभंग करीत तिच्या आईला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला. हा प्रकार कोथरूडमधील सुतारदरा परीसरातील समर्थ कॉलनीत मंगळवारी रात्री घडला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली.

नितीन रामदास सणस (वय २८, रा. चाळ नं.२४,सुतारदरा कोथरूड ) असे सराईत गुन्हेंगाराचे नाव आहे. त्याच्यासह कुमार अशोक घोडे (वय ३०, रा. न्यु अहिरेगाव, वारजे माळवाडी) यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध विनयभंग करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व वाहनाची तोडफोड करीत दहशत निर्माण केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

आरोपी सणस याचे काही दिवसापूर्वी सुतारदरा भागातील एका तरूणासोबत भांडण झाले होती. त्याचा राग मनात ठेवून नितीन सणस हा मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्या इतर दोन साथीदारांसह  सुतारदरा भागात गेला. तेथे त्यांनी तरूणाच्या घरावर दगडफे करीत दहशत निर्माण केली. दरम्यान, घराबाहेर कोण गोंधळ घालतय हे पाहण्यासाठी तरूणाची बहिण घराबाहेर आली. तेव्हा  सणसने तिच्या कानाखाली लगावुन तिच्याशी झटापट केली. त्यामध्ये तरुणीचा टीशर्ट फाटला. आरोपीने तरूणीसह तीच्या आईला कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर तरुणीस तुझा भाऊ,  बापाला खलास करतो अशी धमकी देत आरोपी तेथून निघुन गेले. त्यानंतर त्यांनी बुधवारी पहाटे सुतारदरा परिसरात येवून वाहनांची तोडफोड केली.

दरम्यान, सराईत गुन्हेगाराने सुतारदरा भागात दहशत निर्माण केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट तीनच्या  पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक विकास शिंदे, संजय गायकवाड, कर्मचारी दत्तात्रय गरूड, रोहिदास लवांडे, रमेश उगले यांनी आरोपी नितीन सणस आणि कुमार घोेडे यांना ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Breach of modesty crime