मुलीही उमटवितात कर्तृत्वाचा ठसा - शरद पवार

चांदणी चौक (पुणे) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून शालेय मुलींना सायकल वाटपप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार व टाटा ट्रस्टचे अधिकारी (मध्यभागी).
चांदणी चौक (पुणे) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून शालेय मुलींना सायकल वाटपप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार व टाटा ट्रस्टचे अधिकारी (मध्यभागी).

पौड - ‘आपल्या समाजामध्ये एकेकाळी असा समज होता की, कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे आहे; परंतु कर्तृत्व दाखविण्याची संधी आणि शिक्षण व प्रशिक्षण मिळाले की, मुलीही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवितात, हे अनेक महिला व मुलींना दाखवून दिले आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतासारख्या खंडप्राय देशाचे नेतृत्व अनेक वर्षे करून जगात भारताची प्रतिमा उंचावली. संधीचा उगम शाळेपासून आहे. ज्ञानसंपादन करणे व आत्मविश्‍वास वाढविणे याची सुरवात प्राथमिक, माध्यमिक शिक्षणातून होते,’’ असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. 

खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि मुळशी तालुक्‍यातील इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून टाटा ट्रस्ट, पवार चॅरिटेबल ट्रस्ट, एम्फती फाउंडेशन आणि मेन्टॉर फाउंडेशन यांच्या वतीने दीड हजार मुली आणि आशा सेविकांना सायकली मिळाल्या. पुण्याच्या चांदणी चौकातील चांदणी लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते. खासदार सुळे, टाटा ट्रस्टचे सल्लागार बर्झिस तारापूरवाला, मुख्य वित्त अधिकारी आशिष देशपांडे, संतोष भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सविता दगडे, कोमल साखरे, पांडुरंग ओझरकर, सुनील चांदेरे, अमित कंधारे, शंकर मांडेकर, अंजली कांबळे, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, रवींद्र कंधारे, चंद्रकांत भरेकर, राधिका कोंढरे, चंदा केदारी, वैशाली गोपालघरे, जितेंद्र इंगवले आदी या वेळी उपस्थित होते. 

तारापूरवाला म्हणाले, ‘‘सायकलीची चाके म्हणजे प्रगतीची चाके आहेत.’’ 
दरम्यान, मुळशी तालुक्‍यातील पत्रकारांनी मार्च महिन्यात दिल्लीचा अभ्यास दौरा केला. त्यावर त्यांनी ‘मुळशीकरांची दिल्ली सफर’ हे पुस्तक तयार केले. त्याचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. तसेच, गुणवंतांचाही सत्कार केला.

मुलींना शिक्षणासाठी सर्वांत जास्त सायकली देणारे महाराष्ट्र राज्य झाले पाहिजे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचे हेल्थ कार्ड तयार केले जाणार आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com