स्कूलबसखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

डोर्लेवाडी - स्कूलबस मागे घेताना वाहनचालकाने दाखविलेल्या निष्काळजी-पणामुळे आज एका चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. झारगडवाडी येथील लहान गटाच्या वर्गात शिकणारी चैतन्या नितीन मासाळ ही विद्यार्थिनी स्कूलबसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली. मात्र, उपचारासाठी बारामतीला नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

डोर्लेवाडी - स्कूलबस मागे घेताना वाहनचालकाने दाखविलेल्या निष्काळजी-पणामुळे आज एका चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. झारगडवाडी येथील लहान गटाच्या वर्गात शिकणारी चैतन्या नितीन मासाळ ही विद्यार्थिनी स्कूलबसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली. मात्र, उपचारासाठी बारामतीला नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील संत तुकाराम महाराज इंग्लिश मीडियम स्कूलसमोर आज सकाळी नऊ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. याच शाळेत चैतन्या ही ‘एचकेजी’ वर्गात शिकत होती. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरून स्कूलबसमध्ये (क्र. एमएच ४२ बी १८७७) आली. बसमधून ती उतरली. सर्व विद्यार्थी उतरल्यानंतर ती पाठीमागून पुढे येत होती. मात्र, तेवढ्यात स्कूलबसचालक मोहन दगडू नाळे याने स्कूलबस वळविण्यास सुरवात केली आणि त्याने स्कूल बस वळवून कोठेही न पाहता थेट रस्त्याने पुढे नेली. मात्र, त्याचक्षणी गाडीमागे आवाज झाला. त्यामुळे तेथील एका महिलेचे तिकडे लक्ष गेले, तर या स्कूलबसच्या चाकाखाली चैतन्या ही सापडल्याचे व ती निपचित पडल्याचे दिसले आणि ती महिला ओरडतच तिथे पोचली. त्यानंतर तातडीने माजी उपसरपंच सोमनाथ नवले त्यांच्या दुचाकीवर तेथे पोचले. त्यांनी लागलीच तिला दुचाकीवरूनच गावातील दवाखान्यात आणले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला बारामतीला नेण्याचा सल्ला संबंधित डॉक्‍टरांनी दिला. मात्र, बारामतीला आणले जात असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचे बारामतीत पोचल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. या घटनेने झारगडवाडी व डोर्लेवाडी या दोन्ही गावांवर शोककळा पसरली.  या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी मोहन नाळे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, तपास शहर पोलिस ठाण्याचे फौजदार नीलेश अपसुंदे करीत आहेत. 
 

एकुलती एक
मासाळ कुटुंबात लहान बाळाने प्रवेश केल्यानंतर घरात चैतन्य पसरले म्हणून मुलीचे नाव नितीन यांनी चैतन्या ठेवले होते. चैतन्या नावाप्रमाणेच वस्तीवरही सगळ्यांच्या आवडीची होती. चैतन्या आज सकाळच्या घटनेत आपल्याला सोडून गेली, या धक्‍क्‍यातून मासाळ परिवार सावरलाच नाही.

Web Title: girl death by school bus accident