पुणे : भरधाव दुचाकी खड्ड्यात आपटल्याने अपघात; तरुणीचा मृत्यू

पुणे : भरधाव दुचाकी खड्ड्यात आपटल्याने अपघात; तरुणीचा मृत्यू

पुणे : रस्त्यावरील खड्ड्यामध्ये दुचाकी आपटल्यामुळे तरुणाच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी खाली पडून तिच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. त्यातच या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास जांभुळवाडी येथील दरीपुलाजवळ घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणास अटक केली आहे. 

सुवर्णा लक्ष्मण पवार (वय 29, रा. सातारा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर योगेश गजानन लुगडे (वय 28, रा. वारजे माळवाडी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश लुगडे व सुवर्णा पवार हे दोघेजण दुचाकीवरुन मुंबई-बंगळुरू महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होते. पवार या दुचाकीवर पाठीमागे बसल्या होत्या. तर लुगडे हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत, रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत दुचाकी वेगात चालविली. त्याची दुचाकी जांभुळवाडी येथील दरीपुलाकडे जाताना हॉटेल मराठेशाहीसमोर आली. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये गाडी जोरदार आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या पवार या दुचाकीवरुन खाली पडल्या. त्यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, लुगडे याने पवार यांना रुग्णालयात नेले नाही. तसेच पोलिसांना याबाबत खबर दिली नाही. त्यामुळे तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यास पोलिसांनी अटक केली.

डोक्यावर हेल्मेट नव्हते

सुवर्णा आणि योगेश हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत होते. मात्र, या दोघांच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते.  

जांभूळवाडीकडून दरी पुलाकडे लुगडे याची दुचाकी वेगात येत होती. त्यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दुचाकी आपटल्याने सुवर्णा पवार या खाली पडल्या. त्यामध्ये त्यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

-  महेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com