पुण्यात चोरट्याला प्रतिकार केल्याने तरुणीवर चाकूने वार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पुणे : मित्र-मैत्रिणींसोबत रस्त्यावर बोलत उभ्या असलेल्या युवतीच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळविणाऱ्या चोरट्याला प्रतिकार केल्याने त्याने तिच्यावर चाकूने वार करण्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एरंडवण्यातील पटवर्धन बागेजवळ घडली. 

याप्रकरणी 23 वर्षांच्या युवतीने (रा. कराड, जि. सातारा) दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांवर दुखापत करून जबरी चोरी करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.

मैत्रिणीसोबत कोथरूड येथील बिगबाजारमध्ये सोमवारी ती खरेदीसाठी आली होती. खरेदी झाल्यानंतर मैत्रिणीसमवेत पटवर्धन बागेजवळ गेली. रात्री साडेदहाच्या सुमारास त्या एका मित्रासमवेत रस्त्यावर गप्पा मारत असताना दुचाकीवरून दोघे जण तेथे आले.

दुचाकीस्वाराने त्यांच्या मित्राला मराठी भाषेत 'सिद्धीगार्डन कुठे आहे? कसे जायचे? ' असे विचारले. त्यांचा मित्र पत्ता सांगत असताना दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने खाली उतरून तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि पळून जाऊ लागला.

तरुणीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने चाकूने तिच्या हातावर वार केले, त्यामध्ये तिच्या डाव्या हाताला जखम झाली. 
या घटनेनंतर अलंकार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

या भागात सीसीटीव्ही आहेत का, याचा आढावा घेण्यात येत आहे. दुचाकी चालविणाऱ्या चोरट्याने चेहऱ्याला मास्क लावला होता. दुचाकीवर मागे बसलेल्याचा उपलब्ध वर्णनावरून पोलिस तपास करीत आहेत. अलंकार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप बुवा याप्रकरणी तपास करीत आहेत.

Web Title: Girl injured in Pune after robber attacked her with knife