बाणेर अपघातात मुलीनंतर आईचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

चार वर्षांचा साहिल अत्यवस्थ; महिला वाहनचालकाला अटक 
पुणे/ औंध - बाणेर परिसरात भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ईशा ऊर्फ इशिकाची (वय ३) आई पूजा अजयकुमार विश्‍वकर्मा (वय २५) हिचाही रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर साहिल शाहीद शेख (वय ४) हा अत्यवस्थ असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी मोटारचालक महिलेला मंगळवारी अटक केली. 

चार वर्षांचा साहिल अत्यवस्थ; महिला वाहनचालकाला अटक 
पुणे/ औंध - बाणेर परिसरात भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ईशा ऊर्फ इशिकाची (वय ३) आई पूजा अजयकुमार विश्‍वकर्मा (वय २५) हिचाही रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर साहिल शाहीद शेख (वय ४) हा अत्यवस्थ असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी मोटारचालक महिलेला मंगळवारी अटक केली. 

निशा शाहीद शेख (वय २७) आणि तिचा भाऊ सय्यद अली (वय २५) हे जखमी असून, त्यांच्यावर मेडीपॉइंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजयकुमार विश्‍वकर्मा गेल्या १० वर्षांपासून बाणेर येथे राहतात. ते येथील चिंतामणी ट्रेडर्स या फॅब्रिकेशनच्या दुकानात कामाला आहेत, तर निशाचे पती शाहीद शेख हे बाणेर येथील अहनफ कार केअर येथे एसी मेकॅनिक आहेत. या अपघातात जखमी झालेला निशाचा भाऊ सय्यद अली हा बबलू सलून या केस कर्तनालयात कामाला आहे. विश्‍वकर्मा कुटुंबीय कुडवार जिल्हा सुलतानपूर (उत्तर प्रदेश) येथील आहे. शेख कुटुंबीयसुद्धा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहेत. 

विश्‍वकर्मा हे त्यांच्या नातेवाइकाच्या लग्नासाठी मंगळवारी कुटुंबासह गावी जाणार होते. त्यासाठी एक महिन्यापूर्वी रेल्वे तिकीटही आरक्षित केले होते. गावी जाण्यापूर्वी खरेदी करण्यासाठी त्यांची पत्नी पूजा शेजारी राहणाऱ्या निशा शाहीद शेख यांच्यासमवेत दुपारी खरेदीसाठी बाणेर येथील डीमार्ट येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी ईशा, निशाचा भाऊ सय्यद अली आणि मुलगा साहिल हे सर्व एकत्र होते. खरेदी करून परतताना रस्ता ओलांडण्यासाठी सर्व जण रस्त्यातील दुभाजकाजवळ थांबले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने थेट दुभाजकावर गाडी नेत पाच जणांना फरफटत नेले.

दुर्घटनेला जबाबदार असलेल्या या महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही या ठिकाणी गतिरोधक बसविले नाहीत. रस्ता दुभाजकांची उंची वाढवण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतलेली नाही. याविरोधात बाणेरवासीयांकडून निषेध व्यक्‍त करण्यात आला.  

आरोपी श्रॉफ हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर दुपारी न्यायालयात हजर केले. तिला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. परंतु, तिच्याविरुद्ध दाखल केलेली सर्व कलमे ही जामीनपात्र असल्याने तिला जामीन द्यावा, अशी मागणी तिच्या वकिलांनी केली होती. ती मागणी न्यायालयाने ग्राह्य मानत तिची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.

निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुजाता जयप्रकाश श्रॉफ (वय ५४, रा. डेक्‍कन जिमखाना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
- दयानंद ढोमे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Web Title: girl & mother death in baner accident