लसीकरणानंतर विद्यार्थिनीला अर्धांगवायू; डॉक्‍टरांचा विषाणू संसर्गाचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

हडपसर : महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या विद्यार्थिनीला रुबेला लसीकरण झाल्यानंतर अर्धांगवायू झाल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे; तर ससूनच्या डॉक्‍टरांनी लसीकरणमुळे अर्धांगवायू झालेला नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीवर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

हडपसर : महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या विद्यार्थिनीला रुबेला लसीकरण झाल्यानंतर अर्धांगवायू झाल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे; तर ससूनच्या डॉक्‍टरांनी लसीकरणमुळे अर्धांगवायू झालेला नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीवर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

श्‍वेता संतोष कांबळे या मुलीला लसीकरणानंतर 'रिऍक्‍शन झाली. विठ्ठलनगर येथील कै. निवृत्ती तुकाराम पवार या महापालिकेच्या शाळेत दुसरीच्या वर्गात श्‍वेता शिकत आहे. श्‍वेताचे वडील संतोष कांबळे म्हणाले, "लस देण्यापूर्वी माझ्या मुलीला कोणताही त्रास नव्हता. पालक सभेमध्ये लस घेतल्यानंतर ताप येण्याची शक्‍यता असते, त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे सांगण्यात आले होते. श्वेताला शनिवारी रात्री ताप आला. रविवारी आणि सोमवारीही तिला ताप होता. तिला उठता बसता येत नव्हते. त्यामुळे मंगळवारी आम्ही माळवाडी येथील साने गुरुजी रुग्णालयात घेऊन गेलो. त्यांनी उपचारास नकार दिला. ससूनमध्ये आम्ही मुलीला दाखल केल्यावर साडेसहा हजारांचे एक इंजेक्‍शन आम्हाला डॉक्‍टरांनी आणायला सांगितले. कसेतरी पैसे गोळा करून ते इंजेक्‍शन आणले. डॉक्‍टरांनी मुलीला अर्धांगवायू झाल्याचे सांगितले आहे.'' 
श्वेताचे वडील हे पूर्वी पेंटिंग व्यवसाय करत. मात्र अपघातात त्यांचा एक पाय निकामी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. तिची आई धुण्याभांड्याची कामे करते. 

''श्‍वेताला 1 डिसेंबरला लस देण्यात आली होती. त्यानंतर तिला कोणताही त्रास झाला नव्हता; पण हाता-पायातील त्राण कमी झाल्याने तिला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या रक्ताचे, शौचाचे, मणक्‍यातील द्रव पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविले आहेत. लसीमुळे अशाप्रकारचा त्रास झाला नसून तो विषाणूंच्या संसर्गाने झाला आहे. त्यावर उपचार सुरू आहेत.'' 
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय 

निकृष्ट निडल कटरबाबत तक्रार 
दरम्यान, लसीकरणासाठी वापरलेली सुई ही इलेक्‍ट्रिक सिरींज डिस्ट्रॉयरमध्ये टाकून जाळणे अपेक्षित आहे. त्यामुळे ती अनवधानाने दुसऱ्या कोणाला टोचण्याचा धोका राहत नाही. केंद्र आणि राज्य सरकारने त्याबाबत निर्देशही दिलेले आहेत. असे असताना पुणे महापालिका मात्र निकृष्ट दर्जाचे साधे प्लॅस्टिक कटर विकत घेऊन त्याचा वापर करीत असल्याची तक्रार डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली. या निडल कटरने सुईचे तुकडे होत नसल्याने सुई टोचण्याचा धोका असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. 
 

Web Title: Girl paralysis after Rubella vaccine; The doctor claims the infection of the virus