नरकातून अखेर तिची सुटका!

नरकातून अखेर तिची सुटका!

पुणे - ओळखीच्या व्यक्तीने तिला फसवून कोलकत्याहून पुण्याला आणले आणि थेट कुंटणखान्यात ढकलले. तब्बल दोन वर्षे ती नरकयातना भोगत होती. यातून बाहेर पडण्यासाठी तिने एका तरुणाशी ओळख वाढविली. "मला वेश्‍याव्यवसाय करायचा नाही, मला माझ्या घरी जायचे आहे' अशी आर्त साद तिने त्या तरुणाला घातली. त्याने तिचे छायाचित्र व्हॉटस्‌ऍपवर कोलकता पोलिसांना पाठविले. तेथील पोलिसांनी पुणे पोलिसांना माहिती दिली अन्‌ तिच्यासह आणखी एका तरुणीची कुंटणखान्यातून सुटका झाली. 

...अशी झाली सुटका ! 
पीडित तरुणीचे छायाचित्र व माहिती त्या तरुणाने व्हॉटस्‌ऍपद्वारे कोलकता पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला 9 ऑक्‍टोबरला दिली. त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने फरासखाना पोलिसांकडे ही माहिती पोचविली. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नवांदे, सहायक पोलिस निरीक्षक आरती खेतमाळीस, महेंद्र पाटील यांच्या पथकाने छायाचित्राद्वारे शोध घेण्यास सुरवात केली. त्या वेळी पोलिस नाईक सचिन कुटे यांना संबंधित तरुणी जुनी सागर बिल्डिंगमध्ये असल्याची खबर मिळाली. त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणावर छापा घालून मदत मागणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची ओळख पटवून तिच्यासह आणखी एका तरुणीची सुटका केली. कुंटणखाना चालविणाऱ्या 40 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. 

इतर तरुणींचीही सुटका होणार का? 
देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुणींना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आणले जाते. अनेकदा त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीरविक्रय करण्यास भाग पाडले जाते. पलायनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीवर कुंटणखाना चालविणारे व त्यांच्या गुंडांकडून अत्याचार केले जातात. या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणी वर्षानुवर्षे आपली कोणीतरी सुटका करेल, या आशेने नरकयातना सोसत राहात असल्याचे इथले वास्तव आहे. पोलिसांकडून इतर तरुणींची सुटका होणार का? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com