आयटीआय अभ्यासक्रमाकडे मुलींची पाठ

आशा साळवी
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पिंपरी - औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)सारख्या रोजगाराभिमुख क्षेत्राकडे मुलींचा कल वाढावा, यासाठी त्यांना ३० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आरक्षणाच्या तुलनेत १० टक्केदेखील मुली प्रवेश घेत नसल्याचे एका माहितीतून स्पष्ट झाले आहे. या वर्षी तीन हजार ३३९ जागांपैकी केवळ ५९३ जागांवर प्रवेश घेतला असून, त्यातून मुलींची आयटीआयविषयी उदासीनता दिसून येते. 

पिंपरी - औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)सारख्या रोजगाराभिमुख क्षेत्राकडे मुलींचा कल वाढावा, यासाठी त्यांना ३० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आरक्षणाच्या तुलनेत १० टक्केदेखील मुली प्रवेश घेत नसल्याचे एका माहितीतून स्पष्ट झाले आहे. या वर्षी तीन हजार ३३९ जागांपैकी केवळ ५९३ जागांवर प्रवेश घेतला असून, त्यातून मुलींची आयटीआयविषयी उदासीनता दिसून येते. 

एकीकडे औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रामध्ये मुलांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे तंत्रज्ञानातील बदलांचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होत आहे. त्यामुळे कंपन्यांकडून तंत्रकुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. त्याचवेळी शहरातील आयटीआयमधील जागा वाढून तीन हजार ३३९ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या क्षेत्राकडे जाण्यास मुली नाउत्सुक असल्याचे दिसून येत आहे. त्यातही ८० ते ८५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुलींचा आयटीआयकडे कल असून, फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन व डिझाइन, ड्रॉफ्ट्‌समन, बेसिक ब्युटी पार्लर अशा अभ्यासक्रमांना त्या विशेष पसंती देत आहेत. तथापि, सेवा आणि उत्पादन क्षेत्रामध्ये वायरमन, मोटर मॅकेनिकल, टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्‍ट्रिशियन अशा मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. अनेक कंपन्यांमध्ये महिलांसाठी खास रोजगार उपलब्ध आहे. मात्र त्यांना अशा महिला मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी कॅम्प एज्युकेशनच्या आयटीआयमध्ये सहा मुलींनी प्रवेश घेतला होता. या वर्षी मात्र एकाही मुलीचा प्रवेश झालेला नाही, अशी माहिती प्राचार्य बसवराज विभूते यांनी दिली. महापालिकेच्या मोरवाडी आयटीआयमध्ये ५०० जागा आहेत. तुलनेने केवळ १५ मुलींनी प्रवेश घेतला आहे. हीच परिस्थिती निगडी शासकीय आयटीआयमध्ये असून, ५४५ जागांपैकी ३५ मुलींनी प्रवेश घेतला आहे. तर औंध आयटीआयमध्ये एक हजार ७९४ जागा असताना फक्त ८५ मुलींनी प्रवेश घेतला असल्याची खंत प्राचार्य सदाशिव खडतरे यांनी व्यक्त केली. 

पालक आणि मुलींनी आयटीआयकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास दरवर्षी ३० टक्के आरक्षणांच्या जागा पूर्ण भरतील. या क्षेत्रात मुलींसाठी अनेक रोजगार उपलब्ध आहेत. मुलींची मानसिकता बदलली पाहिजे.
- शशिकांत पाटील, प्राचार्य, महापालिका मोरवाडी व कासारवाडी गर्ल्स आयटीआय

Web Title: Girls back ITI courses