मुलींनी लांबसडक केसांवर चालवली स्वतःहून कात्री; कारण ऐकून व्हाल आश्चर्यचकीत

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

आपले सुंदर दाट केस कापताना कोणतीही मुलगी शंभरवेळा विचार करेल. पण, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी मात्र कोणताही विचार न करता आपले केस सहज कापून टाकले. कदाचित नवी हेअरस्टाइल किंवा नवा ट्रेंड आला असेल म्हणून त्यांनी केस कापले, असं कोणालाही वाटेल. पण, त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला,

मंचर (पुणे) : आपल्या लांबसडक केसांचा प्रत्येक मुलीला अभिमान असतो, त्यामुळे आपले सुंदर दाट केस कापताना कोणतीही मुलगी शंभरवेळा विचार करेल. पण, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी मात्र कोणताही विचार न करता आपले केस सहज कापून टाकले. कदाचित नवी हेअरस्टाइल किंवा नवा ट्रेंड आला असेल म्हणून त्यांनी केस कापले, असं कोणालाही वाटेल. पण, त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला, कॅन्सरग्रस्तांना केस दान करण्यासाठी. 

निविदिता मेनॉन ही केरळची; तर मृणाल आडे ही अमरावतीची. या दोघी विद्यार्थिनी अनुक्रमे चौथ्या व दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहेत. दोघीही राष्ट्रीय सेवा योजनेत काम करत आहेत. कॅन्सर झालेल्या महिलांना केमोथेरपीमुळे आपले केस गमवावे लागतात. अशा महिलांना केस पुरविण्याचे काम सर्ग क्षेत्र केरळ व इतर सेवाभावी संस्था अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी केस दान केले. 

जेव्हा आपले केस कापून निविदिता व मृणाल या महाविद्यालयात आल्या, तेव्हा सगळेच आश्‍चर्याने पाहत होते. काहीजण त्यांना हसलेही. पण, जेव्हा दोघींनीही केस दान केल्याचे कारण सांगितले, तेव्हा मात्र दोघींनाही सर्वांनी नमस्कार करून शुभेच्छा दिल्या. 

माझी आत्या गीता रामगोपाल यांनी तीन वर्षांपूर्वी सर्ग क्षेत्र संस्थेला स्वतःचे केस दान केले होते. तिची प्रेरणा डोळ्यांसमोर ठेवून वाढदिवसानिमित्त मी डोक्‍याचे सर्व केस कापून सर्ग क्षेत्र केरळ संस्थेला दान केले. 
- निविदिता मेनॉन  

मला दोन वेळा रक्तदान करायचे होते; पण रक्तदान शिबिराला जाऊनही काही कारणास्तव मला रक्तदान करता आले नाही, हे शल्य मला बोचत होते. कॅन्सरग्रस्त असलेल्या व केस गळलेल्या महिलेला आपण केस द्यावेत, असा विचार मनात सतत घोळत होता. त्यामुळे मी डोक्‍यावरचे केस प्रशांती कॅन्सर केअर पुणे या संस्थेला दान केले. 
- मृणाल आडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls carry scissors on their long hair