मतदानासाठीही "सावित्रीच्या लेकी' पुढेच !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे - 'विकासाचा मुद्दा असो की लोकप्रतिनिधी निवडण्यासाठीचा हक्क. आम्ही आपली जबाबदारी विसरलेलो नाही,' असा आत्मविश्‍वास घेऊन महिलांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान केले, तसेच निवडणूक प्रक्रियेच्या कामातही महिला मागे नव्हत्या, त्यामुळे या वेळी निवडणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय दिसला.

पुणे - 'विकासाचा मुद्दा असो की लोकप्रतिनिधी निवडण्यासाठीचा हक्क. आम्ही आपली जबाबदारी विसरलेलो नाही,' असा आत्मविश्‍वास घेऊन महिलांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान केले, तसेच निवडणूक प्रक्रियेच्या कामातही महिला मागे नव्हत्या, त्यामुळे या वेळी निवडणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय दिसला.

मतदान बजावण्यासाठी आलेल्या महिलांचा उत्साह मतदानाच्या अंतिम टप्प्यापर्यंत कायम होता. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता आपल्या कुटुंबासोबत प्रत्येक महिलेने मतदानाचा हक्क बजावला. त्यात ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी होती. विशेष म्हणजे मतदान करण्यासाठी आलेल्यांमध्ये गृहिणींची संख्याही लक्षणीय होती. शहरातील विविध प्रभागांतील मतदान केंद्रांवर मत देणाऱ्यांमध्ये नोकरदार महिलाही होत्या.

मतदान केल्यानंतरचा उत्साह आणि आनंद त्यांनी सेल्फीच्या रूपात टिपलाही, तर मतदान केल्यानंतर गप्पांचा फडही रंगला होता. कोणी मैत्रिणीबरोबर, तर कोणी सहकुटुंब मतदानासाठी आल्या होत्या. त्यात सेलिब्रिटीही मागे नव्हत्या. वीस वर्षांच्या तरुणीपासून ते 80 वर्षांपुढील ज्येष्ठ महिलेने उत्साह दाखवत मतदान केले, तसेच कष्टकरी महिलांनीही मतदान केले.

ज्येष्ठ नागरिक शीला विसाळ म्हणाल्या, 'अनेक वर्षांपासून नियमितपणे मतदान करतेय. मतदान करून लोकप्रतिनिधी निवडणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण पेलली पाहिजे. अनुभव चांगला होता. प्रत्येक महिलेने मतदान केलेच पाहिजे.''

सिंहगड रस्ता सनसिटी परिसरातील मतदार रेणुका शिदोरे म्हणाल्या, 'गेल्या काही वर्षांपासून मी मतदार यादीत नाव नोंदविण्याचा प्रयत्न करीत होते; पण नाव येत नव्हते. यंदा माझे नाव मतदार यादीत आले आणि मला मतदान करण्याची संधी मिळाली. मला माझा हक्क बजावण्याची संधी मिळाल्याने, मतदान केल्याने आता मला व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. मला आज खूपच आनंद झाला आहे. एक नागरिक म्हणून मला अभिमान वाटत आहे.''

स्वप्नाली मोरे म्हणाल्या, 'मी मतदानाचा हक्क दर वर्षी बजावते. यंदा महिलांची संख्या लक्षणीय होती. त्याचा आनंद आहे. अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन मतदान केले ही बाब वाखाणण्याजोगी असून, विकास साधणाऱ्या लोकप्रतिनिधी निवडून यावा.''

मत देणाऱ्या महिलांसाठी मेंदी
मत देणाऱ्या महिलांसाठी खास मेंदी काढून देण्याचा कार्यक्रम आयोजिला होता. ज्या मत देतील त्यांना मेंदी काढून दिली जात होती. मेंदी काढण्यासाठीही गर्दी झाली होती.

मतदानाचे सेल्फी सोशल मीडियावर
तरुणी असो वा नोकरदार महिला प्रत्येकीने मतदान केल्याचा आनंद सेल्फीच्या रूपात टिपला आणि फेसबुकवर प्रोफाइल पिक्‍चर म्हणून अपलोडही केला. मैत्रिणींबरोबर आलेल्या महिलांनी आपल्या सेल्फी इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्‌सऍप आणि ट्विटरवर अपलोड करून मतदानाचा हक्क बजावल्याचा उत्साह नेटिझन्सशी शेअर केला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या काही महिलांनीही मतदान करत सेल्फीत आपला आनंद टिपला.

प्रत्येक कामात महिलांचा सहभाग
निवडणुकीतील कामांमध्ये महिलांचा सहभाग दिसला. अगदी मतदार यादीत नाव शोधण्यापासून ते मतदान केंद्रावर कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांमध्येही महिला होत्या, तर पोलिस बंदोबस्त असो वा वैद्यकीय सुविधा पुरविण्यापर्यंतच्या कामांत महिलांचा सहभाग होता.

Web Title: girls involve in voting