त्या मुलीचे नाव "राधा' ; प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्मलेली पहिली मुलगी

त्या मुलीचे नाव "राधा' ; प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्मलेली पहिली मुलगी

पुणे : प्रत्यारोपित गर्भाशयातून जन्मलेल्या देशातील पहिल्या मुलीचे नाव "राधा' ठेवण्यात आले आहे. गर्भाशय प्रत्यारोपण करून जन्मलेली राधा ही जगातील बारावे बाळ ठरले आहे. दसऱ्याच्या दिवशी 31व्या आठवड्यात सीझर करून ही प्रसूती करण्यात आली. 

देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण 17 मे 2017 रोजी पुण्यात झाले होते. त्यापाठोपाठ 18 मे रोजी दुसरे गर्भाशय प्रत्यारोपण करण्याचा एक इतिहास पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी रचला. त्या दुसऱ्या दिवशी मीनाक्षी वालन यांना तिच्या आईने दान केलेले गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले. या प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयात आठ महिन्यांनंतर गर्भ सोडण्यात आला. हा गर्भ प्रयोगशाळेत विकसित करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर गर्भाच्या वाढीकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष देत होते.

अखेर, 31व्या आठवड्यात सीझर करून प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. दसऱ्याच्या दिवशी रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या बाळाचा जन्म झाला. ती मुलगी झाली. 

याबाबत अधिक माहिती देताना गॅलॅक्‍सी केअर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, "देशात 1978 साली "टेस्ट ट्यूब' तंत्रज्ञान वापरून पहिल्या बाळाचा जन्म झाला. त्यानंतर 40 वर्षांनी आता प्रसूती क्षेत्रातील दुसरे तंत्र विकसित झाले आहे. गर्भाशय प्रत्यारोपण हे नवे तंत्र देशात विकसित झाले आहे.'' 

जगभरात आतापर्यंत 29 जणांवर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्यापैकी फक्त 11 जणांची यशस्वी प्रसूती करण्यात यश आले आहे. त्यापैकी देशातील पहिले यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण आणि त्यानंतर प्रसूतीही पुण्यात झाली आहे. त्या नव्याने जगात आलेल्या मुलीचे नाव राधा असे ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

- जगात गर्भाशय प्रत्यारोपणाच्या 29 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. 
- गर्भाशय प्रत्यारोपणातून जगात आतापर्यंत 12 बालके जन्मली आहेत. 

- स्वीडनमध्ये झालेल्या 14 गर्भाशय प्रत्यारोपणांपैकी 9 बाळांचा जन्म झाला. 
- अमेरिकेत आठपैकी दोन बाळे जन्मली आहेत. 

- स्वीडनमध्ये 2010 पासून गर्भाशय प्रत्यारोपणाचा हा प्रयोग सुरू आहे. 
- भारतात गर्भाशय प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग 2017 मध्ये पुण्यात झाला. 
- पुण्यात आतापर्यंत सहा गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com